आठवड्यातून तीनऐवजी केवळ दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय
दिवसाआड पाणीकपातीमुळे शहरातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती
पाणीकपातीचे नवे वेळापत्रक लागू
माथेरान: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माथेरानमध्ये दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय जाहीर केल्यानंतर तीव्र आक्रोश व टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या ग्रामस्थांच्या सभेनंतर प्राधिकरणाने एक पाऊल मागे घेत आठवड्यातून तीनऐवजी केवळ दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू झाले असून शनिवार व रविवार कोणतीही पाणी कपात होणार नाही. तसेच कुंभे नेरळ येथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने पाणीसंकटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असून, पूर्वीच्या दिवसाआड पाणीकपातीमुळे शहरातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी माथेरानमधील पर्यटन व्यवसाय माथेरान जीवन प्राधिकरणाच्या चुकीच्या धोरणामुळे धोक्यात आला होता. त्यानंतर नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या सभेत जीवन प्राधिकरणकडून उल्हास नदीवरून उचलले जाणारे पाणी दररोज उचलले जावे आणि माथेरान शहरातील शार्लोट लेक तलावातील पाणी उन्हाळी पर्यटन हंगामासाठी राखीव ठेवावे, असा निर्णय घेऊन असेच धोरण पाणी वितरण आणि पाणी उपसा याबाबत असावे अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. ग्रामस्थांच्या सभेत उल्हास नदीवरून दररोज पाणी उचलून शार्लोट लेक तलावातील पाणी उन्हाळी पर्यटन हंगामासाठी राखीव ठेवण्याची आग्रही मागणी करण्यात आली. त्यानंतर उपअभियंता स्वप्नील सुळे यांनी कुंभे येथील नादुरुस्त पंप तात्काळ दुरुस्त करून उल्हास नदीतून पाणी उपसा सुरू करण्याचे जाहीर केले. (फोटो सौजन्य – AI Created)
प्राधिकरणाने कुभे-नेरळ येथून पाणी उचलण्यास सुरुवात केल्याने पाणीकपातीचा कालावधी कमी करणे शक्य झाले आहे. माथेरानला दररोज २० लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून, पर्यटन हंगामात हा उपसा ३५ लाख लिटरपर्यंत पोहोचतो, त्यामुळे शार्लोट लेकचे पाणी पर्यटन हंगामासाठी राखीव ठेवून शहरातील विविध भागांत आठवड्यातून दोन दिवस कपात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हास नदीवरून दररोज पाणी उचलून शार्लोट लेक तलावातील पाणी उन्हाळी पर्यटन हंगामासाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे: ग्रामस्थांच्या आग्रहामुळेच पाणीकपातीत दिलासा मिळाला असून पर्यटन व नागरिकांना मोठा आधार मिळेल.- शिवाजी शिंदे, नगरसेवक, माथेरान
कुंभे-नेरळ येथील नादुरुस्त पंप तात्काळ दुरुस्त करून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे; त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली असून नव्या नियमानुसार कपात कमी करण्यात आली आहे.- स्वप्नील सुळे, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सोमवार व बुधवारः मुस्लिम मोहल्ला, वाल्मिकी नगर, पार्क व्हू पॉईंट नवीन, मंकी पॉईंट, दस्तुरी, बाजार पीव्हीसी, इंदिरा नगर, ऑलिम्पिया एसी.
मंगळवार व गुरुवारः ऑलिम्पिया मेन, पार्क व्हू पॉइंट जुना, मार्केट, कोतवाल नगर, पंचवटी नगर, रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज रोड, ऑलिम्पिया पीव्हीसी.