Raigad News: रायगडमध्ये हिवाळ्याची चाहूल; हापूस आंबा आणि काजू उत्पादनाबाबत बागायतदारांच्या आशा पल्लवित  
रायगड

Raigad News: रायगडमध्ये हिवाळ्याची चाहूल; हापूस आंबा आणि काजू उत्पादनाबाबत बागायतदारांच्या आशा पल्लवित

रायगडमध्ये सकाळ आणि संध्याकाळी गारवा वाढू लागला आहे. थंडीची चाहूल लागल्याने बागायतदारांच्या आशा उंचावल्या आहेत. कारण हापूस आंबा आणि काजू मोहोरासाठी पोषक हवामानाचे संकेत मिळत आहेत.

हर्षदा जाधव
  • गारवा वाढू लागल्याने हळूहळू हिवाळ्याची चाहूल

  • पिकांसाठी पोषक थंड व कोरडे हवामान निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने बागायतदारांच्या आशाही पल्लवित

  • काही भागांत पालवीसह मोहोराची सुरुवात

माणगाव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होऊन सकाळ-सायंकाळी गारवा वाढू लागल्याने हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या बदलामुळे दिलासा मिळाला असून, हापूस आंबा व काजू पिकांसाठी पोषक थंड व कोरडे हवामान निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने बागायतदारांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

रायगडच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या आंबा व काजूचे भवितव्य निसर्गावर अवलंबून असते. अलिबाग, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा व कर्जतसह जिल्ह्यातील विविध भागांत हापूसच्या बागा असून, नोव्हेंबर-डिसेंबर हे महिने बागायतदारांसाठी महत्त्वाचे आहेत. पहाटेचा गारवा, काही भागांतील धुके व रात्रीच्या तापमानातील घट यामुळे हिवाळा जाणवत असला तरी मोहोर प्रक्रियेसाठी थंडीचे सातत्य व हवामानातील स्थिरता निर्णायक ठरणार आहे. नवीन पालवी परिपक्व झाल्यानंतर योग्य थंडी व कोरडे वातावरण मिळाल्यास मोहोरास चालना मिळते; मात्र काही भागांत पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मोहोरास विलंब होण्याची शक्यताही आहे.

दुसरीकडे, काजू हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून काही भागांत पालवीसह मोहोराची सुरुवात झाली आहे. मात्र ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाचा धोका उद्भवल्यास मोहोर व फळधारणेवर परिणाम होऊ शकतो. गेल्या हंगामात हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादनात चढ-उतार व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सुरुवातीची अनुकूल चिन्हे म्हणजे भरघोस उत्पादनाची हमी नसून, मोहोर ते फळधारणेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर हवामानाची साथ महत्त्वाची ठरणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

रायगड आंबा व काजू हंगामातील काही ठळक बाबी

हवामान व परिणामः सकाळ-सायंकाळी गारवा, पहाटे धुके व रात्री तापमान घट; मोहोर निर्मितीसाठी थंडीचे सातत्य आवश्यक.

प्रमुख पट्टेः अलिबाग, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा व कर्जतसह जिल्ह्यातील आंबा-काजू बागा; काही भागांत काजूला मोहोर सुरू.

बागायतदारांना आवाहनः नियमित पाहणी, कीड-रोग नियंत्रण, तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी, पाणी नियोजन आणि बागेची स्वच्छता.

सध्या वाढू लागलेला गारवा हापूस व काजू बागायतदारांसाठी आशेचा किरण असला, तरी केवळ थंडीची सुरुवात पुरेशी नसून आगामी काळात थंडीचे सातत्य, हवामानातील स्थिरता आणि कीड-रोग व्यवस्थापनावरच हंगामाचे यश अवलंबून राहील. - डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार

बागायतदारांच्या आर्थिक आशांना नवी पालवी

बदलत्या हवामानात बागांची नियमित पाहणी करून कीड-रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे, कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच फवारणी करणे, पाण्याचे नियोजन व बागेतील स्वच्छता राखणे आवश्यक आहे. थंडी टिकून राहिल्यास व निसगनि साथ दिल्यास रायगडच्या बागांत मोहोराचा बहर फुलून बागायतदारांच्या आर्थिक आशांना नवी पालवी फुटू शकते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Sheikh Hasina : शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार? दिल्लीतून ढाक्याला जाण्यासाठी केली सरकारी विमानाची मागणी

Bisleri Success Story : 'बिसलेरी' कसा बनला भारतातील सर्वात मोठा ब्रँड? अवघ्या 4 लाखांत खरेदी केलेली कंपनी आज अब्जावधींची; काय आहे कमाल कहाणी ?

WhatsApp Tips: खासगी चॅट्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता? असे सेट करा फिंगरप्रिंट लॉक, सोपी आहे प्रोसेस

Virar Papadkhind Dam : 'पापडखिंड'ची सुरक्षा वाऱ्यावर! लोकप्रतिनिधी, आयुक्तांसमोर पाण्यात छठपूजा; धरणात दुचाकी - रिक्षा धुण्याचे प्रकार वाढले

WhatsApp Web वापरणाऱ्यांनो सावधान! अनोळखी डिव्हाइसवर लॉगिन केल्यास होऊ शकते मोठे नुकसान, गृह मंत्रालयाने दिला इशारा