ठाणे महापालिकेने यंदा पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी १० टक्के पाणीकपात लागू केली आहे
कमी पाऊस आणि मान्सूनने लवकर माघार घेतल्याने पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.
हिरानंदानी इस्टेट येथे ठाणे महापालिकेचे ६० एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे.
ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट येथील ६० एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर पिण्याच्या व्यतिरिक्त अन्य कामांसाठी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यावेळी नगरसेवक विकास पाटील, ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे विनोद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता शिंदे उपस्थित होते.
यंदा कमी पाऊस आणि मान्सूनने लवकर घेतलेली माघार यामुळे ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात सुरू केली आहे. विशेष म्हणजे वर्षभर पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या घोडबंदरवासीयांच्या त्रासात या पाणीकपातीमुळे आणखी भर पडली आहे. शहराला अतिरिक्त ५० ते ६० एमएलडी पाण्याची गरज असल्याचे सांगून आमदार संजय केळकर यांनी नवीन बांधकामांना परवानगी न देण्याबरोबरच, अतिरिक्त पिण्याचे पाणी, पाण्याचा पुनर्वापर आणि अन्य उपाययोजनाही महानगरपालिकेला सुचविल्या आहेत. या बैठकीत हिरानंदानी इस्टेट परिसरात ठाणे महानगरपालिकेने उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पुनर्वापरास योग्य पाण्याबाचतही चर्चा झाली. या केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर न होता ते नाहक खाडीत सोडले जात आहे, त्यामुळे केंद्रावर होत असलेला खर्च वाया जात असून प्रकल्पाच्या उद्देशालाही हरताळ फासला जात असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.
प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिनीमार्फत अथवा टँकरद्वारे उचलून घोडबंदर पट्टधातील गृहसंकुलांना वाहने धुण्यासाठी, उद्यानासाठी आणि तत्सम कारणांसाठी दिल्यास पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, तसेच पाणी टंचाईची तीव्रता देखील कमी होणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले. या सुचनेबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून पुनर्रप्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)