डी-लिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना हा राजकीय चर्चेचा महत्त्वाचा विषय बनला आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डी-लिमिटेशनच्या निर्णयाचे स्वागत केले.
मतदारसंघ पुनर्रचनेमुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत बदल होऊ शकतात.
नागपूर : देशाच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी डी-लिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) ही काळाची गरज आहे. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसह समाजातील विविध घटकांना राजकीय प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. मतदारसंघांची संख्याही वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे राज्याचे कॅबिनेटमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
तसेच देशहिताच्या निर्णयांना विरोधासाठी विरोध करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. या भूमिकेला जनतेचे फारसे समर्थन मिळणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. डी-लिमिटेशनच्या निर्णयाचे स्वागत करताना विखे पाटील म्हणाले, महिला आरक्षण देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रक्रियेमुळे समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्वाची अधिक संधी उपलब्ध होईल. त्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
देशाच्या हिताचा चांगला निर्णय घेतला जात असेल आणि त्यातून सर्वांना संधी मिळणार असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे. मात्र, काँग्रेसची भूमिका विरोधासाठी विरोध करण्याची आहे. काँग्रेस सत्तेत असती आणि तिने असा निर्णय घेतला असता तर त्याला विरोध केला नसता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे घटक पक्ष या निर्णयाच्या समर्थनार्थ असल्याने काँग्रेस निश्चितच एकाकी पडेल, असा दावाही त्यांनी केला.
आव्हाड यांच्यातील मतभेद अंतर्गत विषय
जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्यात नेमके काय मतभेद आहेत, याबाबत त्या पक्षाने निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
प्रश्न 1 : डी-लिमिटेशन म्हणजे काय?
उत्तर : डी-लिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना. लोकसंख्या आणि इतर निर्धारित निकषांच्या आधारे लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या सीमा आणि जागांची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया म्हणजे डी-लिमिटेशन.
प्रश्न 2 : डी-लिमिटेशनबाबत कोणते विधान करण्यात आले आहे?
उत्तर : मतदारसंघ पुनर्रचनेमुळे राजकीय प्रतिनिधित्वाच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील आणि मतदारसंघांची संख्याही वाढेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
प्रश्न 3 : राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणत्या निर्णयाचे स्वागत केले?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या डी-लिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.