संजय शिरसाट यांनी साधला माध्यमांशी संवाद
संसदीय अधिवेशनावरील आरोपांवर दिले उत्तर
पुण्यातील शिवाजीनगर हल्ला प्रकरणावर दिली प्रतिक्रिया
Sanjay Shirsat छत्रपती संभाजीनगर : २०११ च्या जनगणनेवर आधारित सीमांकन प्रक्रियेशी (डिलिमेशन) जोडून महिलांसासंठी ३३% आरक्षण लागू करणे आणि लोकसभेतील जागांची संख्या वाढवणे या उद्देशाने संसदेचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावरून केंद्रासह राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी दोन तृतीयांश बहुमत नसल्याने हे विधेयक मंजूर झाले नाही. मात्र आता पुन्हा एकदा अधिवेशन बोलवण्यात आल्याने सरकारने बहुमताची जुळवणी केल्याचे दिसून येत आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी खासदारांवर विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी १५० कोटी दिल्याच्या आरोपावर उत्तर दिले. तसेच या विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळत असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही हे पैसे घेतले आहेत का असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
संजय शिरसाट म्हणाले, "विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी खासदारांशी चर्चा करावी लागते. सरकार महिलांना सन्मान आणि प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणे योग्य नाही. आगामी लोकसभेत महिला आरक्षण लागू झाल्यास महिलांना सन्मान देण्याची प्रक्रिया पुढे जाईल. घटनेनुसारच अधिवेशन बोलावले जाते."
पुढे ते म्हणाले, "खासदारांना १५० कोटी रुपये दिल्याचा आरोप केला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला, मग त्यांनाही १५० कोटी मिळाले का?" असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधयेकाला विरोध करण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण विधेयकाला विरोध करताना केलेली वक्तव्यं अजिबात योग्य नाहीत."
संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "संजय राऊत यांनी आजपर्यंत केलेली भाकिते कधीच खरी ठरलेली नाहीत. त्यांनी केलेल्या भाकितांचा उलट अर्थ घ्यायचा."
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडलेल्या थरारक हल्ल्येचे घटनेनंतर राज्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत संजय शिरसाट म्हणाले, "गेल्या दोन दिवसांतील पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना वेदनादायी आहेत. रस्त्यावर झालेल्या हत्येच्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अशा घटना घडणे चिंताजनक आहे."