फोटो सौजन्य - एआय Diwali Ank Review:
नवराष्ट्र विशेष

Diwali Ank Review: यंदा काय वाचाल? ब्रँड्सची यशोगाथा, निसर्गोत्सव अन् शिक्षण धोरण!

Diwali Ank Review: 'मी', 'प्रसाद', 'छंद' आणि 'शिक्षणहक्क पत्रिका' या दिवाळी अंकांतील वैविध्यपूर्ण विषय व लेखनाचा आढावा घेणार आहोत. यंदा काय वाचाल? वाचा सविस्तर.

श्रेया देशमुख

सचिन वाघमारे

पुणे, दिवाळी अंक ही महाराष्ट्रातील साहित्यिक परंपरा आहे. यंदाही विविध वैचारिक, सामाजिक, धार्मिक, विचारमंथन करणारे दिवाळी अंक प्रकाशित झाले. या अंकांमधून मागील वर्षभर झालेल्या घडामोडींचा काहींनी वेध घेतला तर काहींनी केवळ कथा, कवितांच्या माध्यामातून साहित्यिक मेजवाणी दिली. यंदाच्या दिवाळीही काही निवडक अंकांचा वेध घेतला. त्यातील काही अंश आज आपण जाणून घेणार आहोत.

‘मी’पणाला वळण देणारा इंग्रजीतील दिवाळी अंक

'मी' या इंग्रजीतील पहिल्या दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष आहे. हा अंक दिनमार्क पब्लिकेशनचा असून याचे संपादक दिनकर शिलेदार हे आहेत. या अंकामध्ये बाजारपेठेतील वेगवेगळ्या यशस्वी ब्रँडची यशोगाथा आणि त्यांची आजची वाटचाल याविषयीची ज्ञानरंजक माहिती दिली आहे. त्यांची निवड महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करुन करण्यात आली आहे. संपादकीयमध्येच आजच्या युगात ब्रँडचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘जेन झी’ च्या दृष्टीने बिझनेसविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये या शब्दाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. खरोखरच ते महत्वाचेही आहे.

त्यामुळे एखादा बिझनेस उभा राहणे, तो विकसित होणे आणि त्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या मनावर राज्य करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते. त्यामुळेच या अंकामधील सर्वच ब्रँडची केलेली निवड यथार्थ आहे. या अंकामध्ये टाटा उद्योग समूह, माणिकचंद ग्रुप, पैठणी, नेस्ले, आदित्य बिर्ला ग्रुप, युनिलिव्हर, रिलायन्स, नादार एंटरप्रायझेस, नायक व आदिदास यासह विविध उद्योगांची यशोगाभा संग्रहित आहे आणि ती मुळातून वाचनीय आहे.

प्रसाद - रंजक आणि माहितीपूर्ण

यंदाचा प्रसाद प्रकाशनाचा दिवाळी अंक ८० वर्षांचा झाला आहे. ज्याचे संपादन डॉ. उमा बोडस आणि डॉ. अंबरीष खरे यांनी केले आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावरील अर्थपूर्ण असणारे चित्रच या अंकात सुरुवातीला लक्ष वेधून घेते. एक तेजोमय दालन उघडून कुतुहलाने त्यामध्ये प्रवेश करणारा मुलगा आणि वेद, साहित्य, युद्ध्, निसर्ग, कला, संस्कृती, इतिहास, अध्यात्म, तंत्रज्ञान या क्षेत्रातील संदेशवहन चित्ररुपातून त्यामध्ये दर्शविले आहे.

संदेशवहन किंवा संदेशन ही या अंकाची थीम आहे. वैदिक काळापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगापर्यंतच्या संवादाचा प्रवास, लिपी, गुप्त संदेश प्रणाली, सांकेतिक भाषा आणि सांस्कृतिक/साहित्यिक लेखन यावर आधारित विषय विविध रंजक आणि माहितीपूर्ण लेख त्यामध्ये आहेत. विषय वैविध्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भ, पुरस्कारप्राप्त तीन अतिशय कुटुंबप्रधान अशा कथा यामुळे तो नक्कीच परिपूर्ण झाला आहे.

छंद : निसर्गोत्सव साजरा करणारा देखणा अंक

आपले छंद दिवाळी अंक नेहमीच वेगळा असतो. यंदाचा अंक निसर्ग या विषयाला वाहिलेला आहे. अंकाची मांडणी जेवढी देखणी आहे तेवढेच यातील लेखांबाबत म्हणता येईल. सर्वच लेख वाचनीय, संशोधनात्मक, बोधप्रद आहेत. एकाच अंकाला दोन कव्हरचा पहिला प्रयोग यामध्ये करण्यात आला आहे आणि तो अंकाला साजेसा झाला आहे. अंकातील अनुक्रमणिकेच्या मांडणीतही नाविन्य आहे. प्रदीप निफाडकर यांनी ‘कल्पवृक्ष’ लेखातून नारळपुराण उलगडले आहे.

‘निसर्ग श्रीरंगाची राधिका’ हा संत बहिणाबाईंच्या काव्यावरील प्रवीण दवणे यांचा लेख म्हणजे जणू निसर्गाचे विभ्रम बहिणीबाईंच्या शब्दांच्या साथीने दवणे यांनी आपल्या लेखनीतून प्रत्यक्ष उतरवले आहेत. गावप्रहरातला निसर्ग हा समीर गायकवाड यांचा लेख गावाच्या निसर्गाची सफर घडवतो. अल्बिनिझम( वर्णकहीनता ) ल्युसिझम (आंशिक वर्णकहीनता) या प्रकरणात पशुपक्ष्यांच्या अनुवांशिक रंगाविषयीची अनोखी माहिती दिली आहे. द्रष्टा अरण्यऋषी -हेन्नी हेव्हिड थोरो हा डॉ. विनोद गोरवाडकर यांनी लिहिलेला लेख मुळातूनच वाचला पाहिजे. ‘मलबार स्वर्ग सोपान’ ही कव्हर स्टोरी केरळमधील मलबारच्या निसर्गाची सफर घडवते.

शिक्षण हक्क पत्रिका हा अंक शैलजा बरुरे यांनी संपादित केला असून समाजवादी शिक्षणहक्क सभेकडून प्रकाशित करण्यात आला आहे. शिक्षण हक्क पत्रिका हे शैक्षणिक चळवळीशी संबंधित असलेले नियतकालिक आहे. त्यांचा यंदाचा दिवाळी अंक राष्ट्रीय 'शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी: चिकित्सा' या विषयाला वाहिलेला आहे.

अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभेचे मुखपत्र असलेल्या या विशेषांकामध्ये देशाचे शिक्षण धोरण, अंमलबजावणी आणि त्याचे यशअपयश याविषयी प्रामुख्याने विचारमंथन केले आहे. त्यामुळे हा दिवाळी अंक वैचारिक असून तो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या शिक्षण या विषयातील समस्यांचा सर्वंकष वेध घेतो. अध्ययनक्षमता, विद्यार्थी गळती, एआयचे आक्रमण, मूल्यशिक्षण यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

शरद जावडेकर यांनी आपल्या लेखामध्ये शिक्षणव्यवस्थेमधील मूलभूत त्रुटींवर बोट ठेवले आहे. शिक्षणव्यवस्थेत नफेखोरी उघड दिसत असताना शासन त्याकडे दुर्लक्ष करते. शिक्षकांची हजारो पदे रिक्त असताना आणि मोठ्या प्रमाणावर शिक्षक म्हणून काम करु इच्छिणारे तरुण-तरुणी उपलब्ध असताना तासिका तत्वावर शिक्षक नेमले जातात. ही उदाहरणे पुरेशी बोलकी आणि व्यवस्थेमधील त्रुटी दाखविणारी आहेत. यातील काही लेख आणखी सविस्तर लिहता आले असते, असे वाचताना जाणवते. मात्र, अंकाच्या निमित्ताने मांडलेल्या बाबींवर व्यापक समाजमंथन झाले तरी या अंकाचे सार्थक होईल, एवढे नक्की!

म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेची जय्यत तयारी; मंत्री जयकुमार गोरेंच्या आदेशानंतर प्रशासन कामाला

Washim News: दुष्काळाचा रब्बी हंगामालाही फटका! कारंजात अवघ्या ३६८ हेक्टरवर पेरणी; शेतकऱ्यांची चिंता वाढली

IND Vs SL A: शर्मा अन् वर्माने उद्ध्वस्त केली लंकेची गोलंदाजी; विजयासाठी ठेवले 318 रन्सचे टार्गेट

'सरकारी योजनांची माहिती घराघरांत पोहोचवणार,' भाजपच्या सेवा दूत अभियानाची तयारी सुरू रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडमध्ये!

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, ४ जखमी