( फोटो सौजन्य- चॅटजीपीटी)  
विज्ञान तंत्रज्ञान

iPhone Security Warning: iPhone युजर्स सावधान! एका क्लिकमध्ये वैयक्तिक माहिती धोक्यात; Telegram CEO यांनी दिला इशारा

iPhone Security Warning: iPhone वापरकर्त्यांसाठी टेलिग्रामचे CEO पावेल दुरोव यांनी सुरक्षेचा इशारा दिला आहे. जुन्या iOS व्हर्जनमधील त्रुटींमुळे वेबसाइट उघडताच खासगी डेटा धोक्यात येऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.

अमृता यादव

iPhone Security Warning: सध्या स्मार्टफोन हॅक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. स्मार्टफोन असो किंवा आयफोन, सायबर हल्ल्यांपासून कोणताही फोन पूर्णपणे सुरक्षित नाही. अशातच आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टेलिग्रामचे CEO पावेल डुरोव्ह यांनी आयफोन वापरकर्त्यांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, iOS च्या जुन्या आवृत्त्यांवर चालणारे आयफोन मोठ्या सायबर हल्ल्याला बळी पडू शकतात. विशेष म्हणजे, केवळ एक वेबसाइट उघडल्यानेही फोनमधील डेटा धोक्यात येऊ शकतो.

एका वेबसाइटमुळे आयफोनमधील डेटा चोरी होण्याचा धोका?

पावेल डुरोव्ह यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आयफोन वापरकर्त्यांना सावध केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जुन्या iOS आवृत्त्या वापरणाऱ्या आयफोन वापरकर्त्यांना हॅकिंगचा धोका असू शकतो. केवळ एखादी वेबसाइट उघडणेही सायबर हल्ल्यासाठी पुरेसे ठरू शकते. त्यामुळे टेलिग्रामकडून जुन्या iOS आवृत्त्या वापरणाऱ्या काही वापरकर्त्यांना अॅपमधून सुरक्षा सूचना पाठवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

सामान्यतः फोन हॅक होण्यासाठी बनावट लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद फाइल डाउनलोड करणे आवश्यक असते, असे अनेकांना वाटते. मात्र, काही सुरक्षा त्रुटींचा गैरफायदा घेतला गेल्यास हॅक केलेल्या वेबसाइटला भेट देणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे इंटरनेट वापरताना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

कोणत्या iOS आवृत्त्यांना धोका? अद्याप स्पष्टता नाही

या संपूर्ण प्रकरणात अद्याप काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. नेमक्या कोणत्या iOS आवृत्त्यांवर या हल्ल्याचा परिणाम होऊ शकतो, कोणत्या सुरक्षा त्रुटींचा गैरफायदा घेतला जात आहे किंवा किती आयफोन वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे, याबाबत पावेल डुरोव्ह यांनी सविस्तर माहिती दिलेली नाही.

दरम्यान, अद्ययावत iOS आवृत्ती वापरणाऱ्या आयफोनवर अशाच प्रकारच्या नव्या मोठ्या हल्ल्याची घोषणा अॅपलकडून करण्यात आलेली नाही. तसेच या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अॅपलने कोणतेही स्वतंत्र आपत्कालीन अपडेट जाहीर केल्याची माहिती नाही. त्यामुळे घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

Zoom, HSBC आणि CNN सारख्या वेबसाइट्सही झाल्या होत्या प्रभावित

हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच मोठी सायबर सुरक्षा घटना समोर आली होती. १७ नोव्हेंबर रोजी हल्लेखोरांनी Optimizely प्लॅटफॉर्ममधील असुरक्षिततेचा गैरफायदा घेत धोकादायक JavaScript कोड टाकला होता. यामुळे Zoom, HSBC, CNN, Salesforce आणि IKEA यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या वेबसाइट्ससह अंदाजे १७८ वेबसाइट्स प्रभावित झाल्याचे वृत्त आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, या धोकादायक स्क्रिप्ट्सच्या माध्यमातून पेमेंट तपशील, कुकीज आणि स्क्रीनशॉट चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच अॅपलच्या उपकरणांना लक्ष्य करणारा एक्सप्लॉइट कोड पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. Optimizely ने आपल्या प्लॅटफॉर्ममधील असुरक्षिततेचा गैरफायदा घेतल्याचे मान्य केले होते. त्यानंतर कंपनीने ही समस्या दुरुस्त करून धोकादायक कोड हटवला.

अॅपलने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, त्या घटनेत लक्ष्य करण्यात आलेली सुरक्षा त्रुटी गेल्या वर्षीच दुरुस्त करण्यात आली होती. मात्र, या घटनेचा आणि पावेल डुरोव्ह यांच्या ताज्या इशाऱ्याचा थेट संबंध अद्याप सिद्ध झालेला नाही.

आयफोन हॅकिंगपासून वाचण्यासाठी काय कराल?

आयफोन वापरकर्त्यांनी सर्वात आधी आपल्या फोनमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध आहे का, हे तपासावे. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम आयफोनमधील Settings उघडा.

  • त्यानंतर General या पर्यायावर क्लिक करा.

  • आता Software Update हा पर्याय निवडा.

अपडेट उपलब्ध असल्यास ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा.

याशिवाय, फोनमध्ये Automatic Updates सुरू ठेवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे नवीन सुरक्षा अपडेट उपलब्ध झाल्यानंतर ते वेळेवर इन्स्टॉल होण्यास मदत होते. आपले ब्राउझर अद्ययावत ठेवणे, अनोळखी वेबसाइट्सपासून दूर राहणे आणि महत्त्वाच्या खात्यांसाठी मजबूत सुरक्षा सेटिंग्ज वापरणे या सवयीही उपयुक्त ठरतात.

एकूणच, आयफोन वापरकर्त्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये. फोनचे सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवणे आणि इंटरनेट वापरताना सतर्क राहणे हाच सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.

गाडी चालवताना चूक झाल्यास पोलीस गाडी जप्त करू शकतात का? जाणून घ्या हक्क आणि वाहन सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया

RBI Bank Holidays December : महत्त्वाची कामे आधीच उरकून घ्या! डिसेंबर महिन्यात बँका इतके दिवस बंद राहतील; पाहा संपूर्ण लिस्ट

OpenAI vs Apple वाद चिघळला! व्यावसायिक संबंध बिघडवल्याचा गंभीर आरोप

Black Friday Car Sale: खरंच ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये निम्म्या किमतीत मिळतात कार? फसव्या जाहिरातींना भुलण्यापूर्वी जाणून घ्या सवलतींचे खरे गणित

Sugarcane Farmers PIL : ऊसदरात कारखान्यांची मनमानी? ऊस नियंत्रण मंडळाच्या स्थापनेसाठी जनहित याचिका