व्हॉट्सॲप वेबच्या वापराबाबत सावधगिरी बाळगणं आवश्यक
एका चुकीमुळे खासगी चॅट होऊ शकतात लीक
खासगी चॅट, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि बँकिंग माहितीला धोका
व्हॉट्सॲपवर खासगी संभाषण आणि महत्त्वाची माहिती शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबरक्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने व्हॉट्सॲप वेबच्या वापराबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये व्हॉट्सॲप वेबच्या अधिकृत लॉगिन सत्राचा गैरवापर करून दुसऱ्या व्यक्तीला वापरकर्त्यांच्या खात्यापर्यंत अनधिकृत प्रवेश मिळवता येऊ शकतो. त्यामुळे खासगी चॅट, संपर्क यादी आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
सायबर युनिटच्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲप वेब लॉगिन सत्रावर दुसऱ्या व्यक्तीने अनधिकृत प्रवेश मिळवल्यास तो संबंधित खात्याचा वापर मूळ वापरकर्त्याप्रमाणे करू शकतो. यामध्ये खासगी संदेश वाचणे, संबंधित व्यक्तीच्या नावाने इतरांना संदेश पाठवणे, संपर्क यादी आणि ग्रुपमधील संभाषण पाहणे अशा प्रकारांचा समावेश आहे, सायबर गुन्हेगार या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फिशिंग, सोशल इंजिनिअरिंग आणि आर्थिक फसवणूक करू शकतात, परिचित व्यक्तीच्या नावाने आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवून इतर नागरिकही फसवणुकीचे बळी ठरू शकतात. (फोटो सौजन्य – AI Created)
आय ४ सीने विशेषतः कार्यालयीन, सार्वजनिक आणि सामायिक संगणकांवर व्हॉट्सॲप वेब वापरताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सायबर कॅफे, सार्वजनिक किऑस्क, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून वापरण्यासाठी घेतलेल्या संगणकावर व्हॉट्सॲप लॉगिन करणे टाळावे. अशा संगणकांचा वापर अनेक व्यक्ती करत असल्यामुळे लॉगिन सत्राचा गैरवापर होण्याची शक्यता असते. सरकारी, आर्थिक, संस्थात्मक किंवा गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीही संगणकावरील व्हॉट्सॲप वेबचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लॉगिन सत्र खुले ठेवू नका काम पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सॲप वेब लॉगआउट करा. विशेषतः कार्यालयीन किंवा सामायिक संगणकावर खाते सुरू ठेवू नका.
प्रत्येक वेळी लॉगआउट करा केवळ ब्राउझरची विंडो किंवा टॅब बंद करणे पुरेसे नाही, काम संपल्यानंतर स्वतः लॉगआउट करणे आवश्यक आहे.
प्रायव्हेट मोड वापरा: व्हॉट्सॲप वेब वापरणे आवश्यक असल्यास विश्वासार्ह संगणकावर इनकॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राउझिंग मोडचा वापर करा. तरीही ब्राउझर बंद करण्यापूर्वी लॉगआउट करा.
अनोळखी संगणक टाळा: सायबर कॅफे किवा सार्वजनिक संगणकांवर वैयक्तिक व्हॉट्सॲप खाते लॉगिन करू नका.
सॉफ्टवेअर अपडेट ठेवा संगणकाची ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राउझर आणि सुरक्षा सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा.
संशयास्पद फाइल्सपासून सावध राहा: अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड आणि कॅक केलेले सॉफ्टवेअर वापरणे टाळा.
संवेदनशील माहिती शेअर करू नका: सरकारी, आर्थिक आणि संस्थात्मक गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी असुरक्षित किवा सामायिक संगणकाचा वापर करू नका.
आपल्या व्हॉट्सॲप खात्यातून आपण न पाठवलेले संदेश इतरांना जात असल्याचे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, तसेच, आपल्या संपर्कातील व्यक्तींकडून संशयास्पद संदेशांबाबत विचारणा झाल्यास तातडीने खात्याची सुरक्षा तपासावी. व्हॉट्सॲपच्या लिंक्ड डिव्हाइसेस विभागात जाऊन अनोळखी उपकरणांचे लॉगिन तपासावे आणि संशयास्पद सत्र त्वरित लॉगआउट करावे, संस्थांनीही अधिकृत आणि संवेदनशील कामांसाठी व्हॉट्सॲप वेबचा वापर टाळावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
वापर अपरिहार्य असल्यास प्रायव्हेट ब्राउझिंग मोड आणि प्रत्येक वेळी लॉगआउट करण्याची सवय ठेवावी. विशेष म्हणजे, प्रायव्हेट मोड हा केवळ अतिरिक्त सुरक्षेचा उपाय आहे. तो संपूर्ण सुरक्षेची हमी देत नाही. त्यामुळे डिजिटल ओळख, खासगी संभाषण आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी वापरकर्त्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.