27 नोव्हेंबरला Black Friday सेल
मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर बंपर डिस्काउंट
भारतातही Black Friday ची क्रेझ वाढतेय
Black Friday History: दिवाळीचा सेल संपताच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आणि मोठ्या शोरूम्सबाहेर 'ब्लॅक फ्रायडे सेल'चे बोर्ड झळकायला लागलेत. मोबाईल, लॅपटॉप, कपडे, शूज आणि घरातल्या वस्तूंवर कंपन्यांकडून बंपर डिस्काउंट दिला जातो. अमेरिकेत सुरू झालेला हा शॉपिंग उत्सव आता भारताच्या शॉपिंग कॅलेंडरचाही अविभाज्य भाग बनला. नेमका हा 'ब्लॅक फ्रायडे' काय आहे, त्याचं नाव असं का पडलं आणि भारतीयांमध्ये याची क्रेझ का वाढतेय, हे सविस्तर जाणून घेऊया.
दरवर्षी अमेरिकेत नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी 'थँक्सगिव्हिंग डे' साजरा केला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 'ब्लॅक फ्रायडे' येतो. यंदा आज (26 नोव्हेंबर 2026) थँक्सगिव्हिंग डे असल्याने, उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबर 2026 रोजी 'ब्लॅक फ्रायडे' साजरा केला जाणार आहे.
हा दिवस अमेरिकेत ख्रिसमसच्या खरेदीची अधिकृत सुरुवात मानला जातो. यानंतर येणाऱ्या सोमवारला 'सायबर मंडे' म्हणतात, जो प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंगसाठी ओळखला जातो. अमेरिकेच्या 'नॅशनल रिटेल फेडरेशन'नुसार (NRF), थँक्सगिव्हिंगपासून सायबर मंडेपर्यंतचे पाच दिवस किरकोळ व्यापारासाठी वर्षातले सगळ्यात व्यस्त दिवस असतात.
या नावामागे दोन रंजक संदर्भ आहेत. व्यापारी भाषेत कंपन्या तोट्यातून (लाल शाई - Red) नफ्यात (काळी शाई - Black) येतात, म्हणून या दिवसाला ब्लॅक फ्रायडे म्हटलं जातं, असा एक समज आहे.
मात्र, याचा खरा ऐतिहासिक संबंध 1960 च्या दशकातल्या अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहराशी आहे. थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी ख्रिसमसची खरेदी आणि शहरातल्या फुटबॉल सामन्यांमुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळ उडायचा. या अव्यवस्थेमुळे वैतागलेल्या पोलिसांनी या दिवसाला 'ब्लॅक फ्रायडे' असं नाव दिलं होतं. पुढे 1980 च्या दशकात व्यापाऱ्यांनी या नावाला सकारात्मक वळण देत त्याचं मोठ्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये रूपांतर केलं.
भारतात थँक्सगिव्हिंग साजरा होत नसला, तरी इंटरनेट, सोशल मीडिया आणि जागतिक ब्रँड्समुळे हा ट्रेंड भारतीय बाजारपेठेत रुजलाय. मेटाने 27 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतीय ग्राहक आता फक्त पारंपरिक सणांची वाट न बघता वर्षभर चालणाऱ्या जागतिक ऑफर्सचाही लाभ घेत आहेत.
म्हणजेच दिवाळीत ज्यांना खरेदी करता आली नाही, त्यांच्यासाठी ब्लॅक फ्रायडे म्हणजे दुसरी संधी आहे. कंपन्यांसाठी पण दिवाळीनंतरचा स्टॉक संपवायचा हा सगळ्यात भारी मार्ग ठरतो.