आईकडून ६०० डॉलर उधार घेत सुरू केला व्यवसाय
छोट्या रेस्टॉरंटचे जागतिक ब्रँडमध्ये रूपांतर
व्यवसायासोबत सामाजिक कार्यातही मोठे योगदान
USA News : जगप्रसिद्ध पिझ्झा ब्रँड 'पिझ्झा हट'ची स्थापना करणारे उद्योजक डॅन कार्नी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले आहे. जवळपास सात दशकांपूर्वी आपल्या धाकट्या भावासोबत एका छोट्याशा रेस्टॉरंटमधून सुरू केलेला व्यवसाय पुढे जगातील सर्वात मोठ्या पिझ्झा ब्रँडपैकी एक बनला. त्यांच्या निधनामुळे जागतिक खाद्यव्यवसाय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. १३ नोव्हेंबर २०२६ या रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आहे
डॅन कार्नी आणि त्यांचे धाकटे भाऊ फ्रँक कार्नी यांनी १९५८ मध्ये अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील विचिटा येथे पहिल्या पिझ्झा हट रेस्टॉरंटची सुरुवात केली. त्यावेळी दोघेही शिक्षण घेत होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या आईकडून ६०० डॉलर उधार घेतले होते.
सुरुवातीला एका छोट्याशा रेस्टॉरंटमधून सुरू झालेल्या या व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी पद्धतीने व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. अवघ्या एका वर्षात पहिली फ्रँचायझी सुरू झाली आणि पिझ्झा हटचा प्रवास वेगाने पुढे गेला.
पिझ्झा हटने काही वर्षांतच अमेरिकेबाहेरही आपला विस्तार केला. १९६९ मध्ये कंपनीने आपली ओळख बनलेली लाल छताची (Red Roof) रेस्टॉरंट रचना स्वीकारली. १९७१ पर्यंत विक्रीच्या बाबतीत पिझ्झा हट जगातील सर्वात मोठी पिझ्झा साखळी बनली होती.
वाढत्या लोकप्रियतेमुळे १९७७ मध्ये पेप्सिकोने सुमारे ३०० दशलक्ष डॉलरमध्ये पिझ्झा हट विकत घेतले. एका छोट्या रेस्टॉरंटपासून सुरू झालेला हा प्रवास जागतिक स्तरावरील व्यावसायिक यशाचे उदाहरण ठरला. आज पिझ्झा हटची जगभरात हजारो रेस्टॉरंट्स आहेत.
डॅन कार्नी यांची ओळख केवळ यशस्वी उद्योजक म्हणून मर्यादित नव्हती. त्यांनी सामाजिक कार्यातही महत्त्वाचे योगदान दिले. कॅन्ससमधील सेरेब्रल पाल्सी रिसर्च फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल ५० वर्षे काम केले. शिक्षण, समाजसेवा आणि स्थानिक संस्थांच्या विकासासाठीही त्यांनी योगदान दिले.
विचिटा स्टेट युनिव्हर्सिटीशी त्यांचे सात दशकांहून अधिक काळ जवळचे नाते होते. त्यांच्या धाकट्या भावाचे आणि पिझ्झा हटचे सह-संस्थापक फ्रँक कार्नी यांचे २०२० मध्ये निधन झाले होते. आता डॅन कार्नी यांच्या निधनाने या दोन भावांच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे.