फोटो सौजन्य- iStock
वर्ष संपण्यास अखेरचे काही दिवस राहिले आहेत.या वर्षाच्या अखेरच्य काही दिवसामध्ये काही प्रमाणात ऑफर्स काही ऑटोमोबाईल कंपन्यांकडून दिल्या जात आहेत मात्र सर्वच कंपन्याही आता पुढील वर्षाचे नियोजन करत आहेत. ग्राहकांना 2025 मध्ये नवनवीन अत्याधुनिक कार उपलब्ध होणार आहेच. मात्र या कारच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये निसान, ऑडी, बीएमडब्ल्यू , ह्युंदाई आदी कंपन्यांचा समावेश आहे. याचधर्तीवर आता भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कपंनी असलेल्या मारुती सुझुकीने कारच्या किंमतीमध्ये वाढ होण्याचे जाहीर केले आहे. मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किंमतीमध्ये लवकरच भारतात 4% पर्यंत वाढ होणार असल्याचे जाहीर केले आहे. ही किंमतवाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
कंपनीने वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेशनल खर्चामुळे जानेवारी 2025 पासून कारच्या किंमती वाढवण्याची योजना आखली आहे. असे दरवाढीचे कारण समोर येत आहे. ही दरवाढ 4 टक्क्यांपर्यंत अपेक्षित असून प्रत्येक मॉडेलनुसार यामध्ये फरक असणार आहे. “कंपनी सतत खर्च ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करत असताना, वाढलेल्या किंमतीचा काही भाग बाजारात पाठवण्याची आवश्यकता असू शकते,” असे मारुती सुझुकीच्या नियामक फाइलिंगमध्ये नमूद केले आहे.
कंपनीची विक्री आणि निर्यात
उल्लेखनीय म्हणजे, मारुती सुझुकीने गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये डीलरशिपवर पाठवलेल्या कारच्या संख्येत 10% वाढ केली आहे. कार विक्रेत्याने गेल्या महिन्यात 1,81,531 युनिट्सची विक्री नोंदवली होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,64,439 होती. कंपनीची कार निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे आकडे समोर येत आहेत. 28,633 वाहनांची कंपनीने निर्यात केली आहे. या विक्रीवरुनच कंपनीची भारतातील आणि जगातील लोकप्रियता कळते. परदेशामध्ये मारुती सुझुकीची बाजारपेठे ही मुख्यत: आशियाई देश, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देश हे आहेत.
मारुती सुझुकीच्या बाजारपेठेतील कार
मारुती सुझुकीकडे हॅचबॅक सेगमेंटमध्ये विक्रीसाठी WagonR, Swift, Celerio, Alto K10 आणि S-Presso सारखी मॉडेल्स आहेत, एरिना आउटलेट्सद्वारे MPV ( मल्टी पर्पज व्हेइकल) सेगमेंटमध्ये Eeco आणि Ertiga आहेत SUV सेगमेंटमध्ये ब्रेझा कार . दरम्यान, ब्रँडच्या प्रीमियम Nexa आउटलेट्समध्ये इग्निस, बलेनो, फ्रॉन्क्स, सियाझ, XL6, जिमनी आणि इनव्हिक्टो सारखी मॉडेल्स देशात विक्रीसाठी आहेत.
इतर कंपन्यांनी केलेली दरवाढ
मारुती सुझुकीची प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या Hyundai Motor कडून 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या कारच्या किंमतीमध्ये 25,000 रुपयापर्यंत वाढ केली जाणार आहे.निसान मोटर इंडियाने जानेवारी 2025 मध्ये Magnite या त्यांच्या लोकप्रिय मॉडेलच्या किंमतीमध्ये 2 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . त्यामुळे नवीन वर्षात ऑफर्सची घोषणा होणाऱ्यापूर्वी दरवाढीची घोषणा झाल्याने कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मागावे लागणार आहेत.