फोटो सौजन्य: iStock
भारतीय ग्राहक कार खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार करत असतो. त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे कारची किंमत. जर एखादी कार उत्तम फीचर्ससह बजेट फ्रेंडली किमतीत ऑफर होत असेल तर त्याची विक्री झपाट्याने वाढताना दिसते. म्हणूनच तर कंपन्या काही वेळेस आपल्या कारवर तगडा डिस्कॉउंट्स देताना दिसतात. आता ब्रिटिश ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी JSW MG Motors आपल्या काही कारवर फेब्रुवारीत तब्बल 2 लाखांपर्यंतचे डिस्काउंट देत आहेत.
जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स भारतात विक्रीसाठी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपासून ते फुल्ल साइज एसयूव्ही सेगमेंटपर्यंतच्या कार ऑफर करते. जर तुम्ही फेब्रुवारी 2025 मध्ये कंपनीची कोणतीही एसयूव्ही किंवा ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एमजी मोटर्स त्यावर लाखो रुपयांचे डिस्काउंट देत आहे. या महिन्यात कोणत्या कारवर कंपनी किती सूट देत आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Comet EV जर तुम्ही फेब्रुवारी 2025 मध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याच्या बुकिंगवर 40 हजार रुपयांची बचत होऊ शकते. ही बचत त्यांच्या 2024 मॉडेल्सवर दिली जात आहे. याशिवाय, जर 2025 मध्ये बनवलेले युनिट खरेदी केले तर कंपनीकडून 35 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहेत.
जेएसडब्ल्यू एमजी मोटर्सची मिड साइज एसयूव्ही म्हणून अॅस्टर विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये ऑफर केलेली ही एसयूव्ही खरेदी करून तुम्ही तब्बल 1.45 लाख रुपये वाचवू शकता. ही ऑफर 2024 मध्ये बनवलेल्या युनिट्सवर दिली जात आहे. जर तुम्हाला 2025 मधील युनिट्स खरेदी करायचे असतील, तर या महिन्यात जास्तीत जास्त 50000 रुपयांची बचत करता येईल.
जेएसडब्ल्यू एमजी हेक्टर ही एमजी मोटर्सने भारतीय बाजारात पाच, सहा आणि सात सीट्स पर्यायांसह आणली आहे. उत्तम फीचर्स आणि इंजिन पर्यायांसह येणाऱ्या या एसयूव्हीवर फेब्रुवारी 2025 मध्ये सर्वात मोठी बचत होणार आहे. कंपनी हेक्टर डिझेलच्या 2024 युनिट्सवर 2 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर देत आहे. या महिन्यात पेट्रोल युनिट्सवर 1.85 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
माहितीनुसार, JSW MG फेब्रुवारी 2025 मध्ये काही कारवर कोणत्याही प्रकारची ऑफर देत नाही आहे. या महिन्यात ज्या कारवर कोणतीही ऑफर दिली जात नाही त्यात JSW MG Windsor आणि JSW MG Gloster यांचा समावेश आहे.