फोटो सौजन्य - Social Media
पावसाळ्यातील रायडिंग म्हणजे निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची अनोखी संधी असते. थंड वाऱ्याचा स्पर्श, हिरवळीनं नटलेले रस्ते आणि पावसाच्या सरींसोबत मिळणारी एक वेगळीच मजा! मात्र, हे रोमांचक राईडिंग सुरक्षितही असावं लागते. पावसामुळे ओले रस्ते,स्लिप होण्याचा धोका, पाण्याने भरलेले खड्डे आणि कमी दृष्यमानता या सर्व गोष्टी रायडर मंडळींसाठी आव्हान निर्माण करतात. त्यामुळे प्रत्येक रायडरने काही महत्त्वाच्या खबरदारीच्या टिप्स लक्षात घेणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम, रेनकोट आणि वॉटरप्रूफ शू कव्हर वापरणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू शकता. हेल्मेट आणि व्हायझर स्वच्छ ठेवून अँटी-फॉग स्प्रे वापरणे दृष्यमानता टिकवण्यास मदत करते. वाहनाचे टायर योग्य स्थितीत आहेत का, त्यांची ग्रिप चांगली आहे का हे तपासणे आवश्यक आहे, कारण पावसात स्लिप होण्याचा धोका अधिक असतो. ओल्या रस्त्यावर ब्रेकिंग अंतर वाढवावे आणि हळू ब्रेक द्यावा, जेणेकरून गाडीवर नियंत्रण राहील.
मोबाईल, कागदपत्रे, पॉवरबँक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू प्लास्टिक झिप पाऊचमध्ये ठेवाव्यात. पाण्याच्या खड्ड्यांपासून दूर राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला हळू गतीने गाडी चालवा. कमी दृष्यमानतेसाठी रिफ्लेक्टिव्ह गिअर वापरा, ज्यामुळे इतरांना तुम्ही दिसाल. वाहनाची ब्रेक्स, हेडलाइट्स, क्लच, वायपर्स यांची नियमित तपासणी गरजेची आहे. तसेच, हँडल ग्रिप्सवर अँटी-स्लिप कव्हर लावल्याने गाडीवर नियंत्रण राखता येते.
पावसात शक्यतो एकट्यानेच प्रवास करावा, डबल सीट टाळावी. गाडी पार्क करताना झाकण लावून गाडीच्या भागांचे नुकसान टाळावे. हॉर्न आणि इंडिकेटर व्यवस्थित चालतात का हे तपासावं. बॅगमध्ये बॅकअप कपडे ठेवा. कागदपत्रे पाण्यापासून सुरक्षित राहतील अशा झिप पाऊचमध्ये ठेवा. गुगल मॅप अपडेट ठेवा, कारण पावसामुळे ट्रॅफिक किंवा रस्ते बंद होण्याची शक्यता असते. हाय स्पीड टाळा आणि अचानक वळणं घेणं टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं – मुसळधार पावसात अडकण्याची शक्यता असल्यामुळे जवळचं हॉटेल किंवा शेड माहित असणं फायद्याचं ठरतं. अशा सर्व खबरदारीच्या उपायांनी पावसाळ्यातील तुमचं रायडिंग केवळ रोमांचकच नाही, तर सुरक्षितही होईल. म्हणूनच सावध राहा, सुरक्षित राहा आणि राईडिंगचा आनंद लुटा!