फोटो सौजन्य - Social Media
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्स ही आपल्या इन्व्हेस्टर डे २०२५ च्या निमित्ताने मोठ्या विस्तार योजना जाहीर करत ग्राहकांसाठी आश्वासक भविष्य घडवत आहे. या कार्यक्रमात कंपनीने २०२६ ते २०३० या कालावधीत सुमारे ३३,००० कोटी ते ३५,००० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक फक्त नव्या तंत्रज्ञानावरच नाही, तर नव्या गाड्या, अपडेटेड मॉडेल्स आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक लक्ष केंद्रित करून केली जाणार आहे. टाटा मोटर्सने आगामी पाच वर्षांत ३० नवीन कार मॉडेल्स बाजारात उतरवण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये ७ पूर्णपणे नवीन मॉडेल्स असतील, तर उर्वरित २३ गाड्या फेसलिफ्ट व अपग्रेडेड स्वरूपात सादर केल्या जातील. ग्राहकांसाठी हा खूपच मोठा पर्याय असणार आहे, कारण यात पेट्रोल, डिझेल, सीएनजीसह इलेक्ट्रिक कार्स यांचा समावेश असेल. टाटाच्या विद्यमान गाड्यांमध्ये नेक्सॉन, पंच, टियागो, टिगोर, कर्व आणि हैरियर यांचे इलेक्ट्रिक पर्याय आधीच उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हैरियर ईव्ही या SUV ने मध्यम किंमतीच्या सेगमेंटमध्ये एक नवीन बेंचमार्क तयार केला आहे.
आगामी काळात सिएरा ही टाटाची आयकॉनिक कार पेट्रोल, डिझेल आणि ईव्ही अशा सर्व प्रकारांत सादर होणार असून, यंदाच्या वर्षातच ती लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कार्सची डिझाईन, टेक्नॉलॉजी आणि फिचर्स यांमुळे जागतिक बाजारात टाटा मोटर्सची प्रतिमा अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. अविन्या ब्रँडचे कॉन्सेप्ट मॉडेल मागील काही वर्षांपासून चर्चेत असून, त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टाटा मोटर्स आपली आफ्टरसेल्स सर्विस आणखी मजबूत करण्यासाठी भारतातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांत विस्तार करणार आहे. याशिवाय, ईव्ही गाड्यांसाठी आवश्यक असणारे चार्जिंग स्टेशन नेटवर्क वाढवण्यावर कंपनीचे विशेष लक्ष आहे.
सध्या टाटाच्या कार विक्रीपैकी सुमारे १०% हिस्सा इलेक्ट्रिक गाड्यांचा आहे. मात्र कंपनी २०२७ पर्यंत हा हिस्सा २०% पर्यंत नेण्याचा निर्धार करत आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक कार्सवर सध्या जेवढा खर्च केला जातो, त्याच्या दुप्पट गुंतवणूक कंपनी करणार आहे.
टाटा मोटर्सचा हा पुढील पाच वर्षांचा रोडमॅप पाहता, ग्राहकांसाठी विविध सेगमेंटमध्ये दर्जेदार पर्याय निर्माण होणार आहेत. देसी कंपनी असूनही दर्जा, नविन तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि जबाबदारी यामध्ये टाटा मोटर्सने पुन्हा एकदा स्वतःचा ठसा उमठवण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात टाटा प्रेमींना हे नवीन मॉडेल्स नक्कीच भुरळ घालणार, यात शंका नाही!