फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने कोलकातामध्ये आपल्या आठव्या ‘रजिस्टर व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी’चे (RVSF) उद्घाटन केले आहे. ‘Re.Wi.Re. – रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाने ओळखले जाणारे हे केंद्र दरवर्षी सुमारे २१,००० एंड-ऑफ-लाईफ व्हेईकल्सचे सुरक्षित व पर्यावरणस्नेही स्क्रॅपिंग करण्याची क्षमता ठेवते. या केंद्राचे उद्घाटन पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री स्नेहासिस चक्रवर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. कोलकाताचे महापौर व शहरी विकास मंत्री फिरहाद हकीम, राज्य सरकारचे अधिकारी आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे केंद्र टाटा मोटर्सच्या ‘सेलेडेल सिनर्जीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या भागीदार संस्थेद्वारे चालवले जाणार आहे. या केंद्रात सर्व प्रकारच्या ब्रँडच्या दुचाकी, तीन-चाकी, प्रवासी व व्यावसायिक वाहनांचे स्क्रॅपिंग केले जाणार आहे. Re.Wi.Re. केंद्र पूर्णतः डिजिटल आहे आणि कागदविरहित प्रक्रियांनी युक्त आहे. यात व्यावसायिक वाहनांसाठी सेल-टाइप आणि प्रवासी वाहनांसाठी लाइन-टाइप डिसमॅन्टलिंग सिस्टम आहे. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, तेल, द्रव आणि वायू यांसारख्या घटकांचे सुरक्षितपणे विघटन करण्यासाठी विशेष स्टेशन उपलब्ध आहेत.
या उपक्रमामुळे पश्चिम बंगालमध्ये केवळ मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार नाही, तर पर्यावरणीय भारही लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि संपूर्ण राज्यात तसेच देशात चक्रिय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे मत यावेळी उपस्थित असलेल्या मंत्री आणि कोलकात्याचे महापौर यांनी व्यक्त केले. वाहन उद्योगात वाढत्या घनकचऱ्याचा प्रश्न आणि प्रदूषणाचा धोका लक्षात घेता अशा प्रकारच्या स्क्रॅपिंग फॅसिलिटीज ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष राजेश कौल यांनी सांगितले की, “शाश्वत गतिशीलतेकडे वाटचाल करताना आणि देशात पर्यावरणपूरक स्क्रॅपिंग इकोसिस्टम निर्माण करताना आम्ही एक महत्त्वाचा बदल घडवत आहोत. आमचे उद्दिष्ट म्हणजे जुनी, प्रदूषण करणारी आणि धोकादायक वाहने काढून टाकून वाहतूक क्षेत्र अधिक सुरक्षित, आधुनिक आणि हरित बनवणे.” त्यांनी यावेळी माहिती दिली की, देशभरातील टाटा मोटर्सच्या आठ स्क्रॅपिंग फॅसिलिटीजच्या माध्यमातून दरवर्षी १.३ लाखाहून अधिक वाहने शास्त्रीय पद्धतीने स्क्रॅप केली जात आहेत. ही प्रक्रिया संपूर्णपणे पर्यावरणपूरक असून, या केंद्रांमध्ये कार्यरत कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतलेले असतात.
कोलकातामधील हे Re.Wi.Re. केंद्र हे पूर्व भारतातील तिसरे असे केंद्र असून, याआधी जयपूर, भुवनेश्वर, सुरत, चंदीगड, दिल्ली-एनसीआर, पुणे आणि गुवाहाटी या प्रमुख शहरांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामार्फत जुन्या वाहनांचे सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणीय दृष्टीने जबाबदार विघटन केले जाते. भारत सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाला पूरक अशी ही केंद्रे देशभरात जागरूकता वाढवत असून, वाहन उद्योगातील शाश्वत विकासाची नवी दिशा ठरू लागली आहेत. स्क्रॅपिंग प्रक्रियेमधून निर्माण होणारे धातू, प्लास्टिक, रबर यांचे पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट लावणे शक्य होत असल्याने ही केंद्रे प्रदूषण नियंत्रणात मोलाची भूमिका बजावत आहेत.