येत्या 6 महिन्यात EV च्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीस येणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
जगभरासह भारतात देखील आता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात EV धावताना दिसत आहे. अनेक ग्राहक आता इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. हीच वाढती मागणी पाहता, ऑटो कंपन्या सुद्धा आता बेस्ट फीचर्स आणि रेंज देणारी इलेक्ट्रिक वाहनं लाँच करत आहे. केंद्रीय सरकार सुद्धा EV च्या वापरला चालना मिळावी म्हणून नागरिकांना प्रोत्साहित करत आहे. देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील EV बाबत आपली सकारत्मकता दर्शवित असतात. आता गडकरी यांनी एक मोठे विधान केले आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की, सहा महिन्यांत देशातील इलेक्ट्रक वाहनांच्या म्हणजेच ईव्हीच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीच्या होतील. 32व्या कन्वर्जन्स इंडिया आणि 10व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपोला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, 212 किलोमीटर लांबीच्या दिल्ली देहरादून ऍक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेस वेचे बांधकाम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकारचे धोरण आयात पर्याय, खर्च परिणामकारकता, प्रदूषण मुक्त आणि स्वदेशी उत्पादन आहे. केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशाने आपल्या पायाभूत सुविधा क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे.
सध्या, देशात अनेक कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल वाहनांपेक्षा महाग आहेत. बॅटरीवरील लिथियमचा जास्त खर्च, जो EV च्या किमतीचा एक मोठा भाग आहे. याव्यतिरिक्त, बॅटरी घटकांवरील आयात शुल्क, मर्यादित उत्पादन इत्यादी गोष्टींमुळे एकूण EV च्या खर्चात भर पडते. परंतु, आता नितीन गडकरी यांच्या विधानानंतर EV च्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
भारतातील ईव्ही मार्केटमध्ये स्थिर वाढ दिसून येत आहे. 2024 मध्ये, ईव्हीची विक्री 27% ने वाढून 1.94 दशलक्ष युनिट्सवर पोहोचली, ज्यामध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स या विभागात आघाडीवर होत्या. इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल श्रेणीमध्येही 20 टक्क्यांनी वाढ झाली, यामध्ये जवळजवळ 100,000 युनिट्स विकल्या गेल्या.