Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री!
आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. Volvo कार इंडियाने आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार व्होल्वो ईएक्स30 च्या किंमतीची घोषणा केली आहे. 41 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमतीत ही कार लक्झरी इलेक्ट्रिक कार एक नवा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे 19 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्री-रिजर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना ही कार केवळ 39.99 लाख रुपयांच्या ऑफर किंमतीत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून या कारचे वितरण सुरू होणार असून ही कार पाच आकर्षक रंगांत उपलब्ध राहील.
व्होल्वो ईएक्स30 हे कंपनीचे तिसरे इलेक्ट्रिक वाहन असून ते बंगळुरू येथील होसकोटे कारखान्यात तयार केले गेले आहे. या कारसोबत 11 किलोवॅट वॉल बॉक्स चार्जर स्टँडर्ड दिला जाणार आहे. व्होल्वोचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी सांगितले की, “भारतीय ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किंमतीत लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आणताना आम्हाला आनंद होत आहे. आकर्षक डिझाइन, उच्च दर्जाची परफॉर्मन्स आणि शाश्वततेसाठी वचनबद्धता यामुळे ईएक्स30 भारतीय बाजारात नवा ट्रेंड निर्माण करेल.”
या मॉडेलला स्कॅन्डिनेव्हियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. डेनिम, पीईटी बाटल्या, ॲल्युमिनियम आणि पीव्हीसी पाईप्ससारख्या पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर करून तयार केलेले आतील भाग त्याला अधिक शाश्वत बनवतात. युरो एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाल्याने त्याची सुरक्षितता अधोरेखित होते. कारमध्ये 5 कॅमेरे, 5 रडार आणि 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्सचा वापर करून प्रगत सेफ्टी सिस्टीम दिली आहे.
सिंगल मोटर एक्सटेंडेड रेंज व्हेरिएंटमध्ये 272 एचपी पॉवर, 343 एनएम टॉर्क आणि 69 किलोवॅट अवर लिथियम-आयन बॅटरी मिळते. ही कार 0-100 किमी/ताशी वेग केवळ 5.3 सेकंदात गाठते आणि याची डब्ल्यूएलटीपी प्रमाणित रेंज 480 किमी आहे. टॉप स्पीड 180 किमी/ताशी तर बॅटरी वॉरंटी 8 वर्षे/1.6 लाख किमी देण्यात आली आहे.
इंटिरिअरमध्ये 12.3 इंचाचा हाय-रिझोल्यूशन टच डिस्प्ले, गुगल बिल्ट-इन, ॲपल कारप्ले, 5 ॲम्बिएंट लाइटिंग थीम आणि हारमन कार्डन प्रीमियम ऑडिओ सिस्टिम (9 स्पीकर, 1040 वॅट) मिळते. फिक्स्ड पॅनोरामिक सनरूफ, दोन झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर ॲडजस्टेबल सीट्ससह प्रवास अधिक आरामदायी ठरतो.
सेफ्टीच्या दृष्टीने इंटरसेक्शन ऑटोब्रेक, लेन कीपिंग एड, ब्लिस, 360° कॅमेरा, पादचारी ओळखणारे ऑटो ब्रेकिंग यासारखी प्रगत फीचर्स दिली आहेत.
ईएक्स30 सोबत ग्राहकांना 3 वर्षांची वॉरंटी, 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज, 3 वर्षांचा रोडसाइड असिस्टन्स, 5 वर्षांचे डिजिटल कनेक्ट प्लस सब्सक्रिप्शन तसेच वॉल बॉक्स चार्जर दिला जात आहे.