फोटो सौजन्य: iStock
भारतात जरी बजेट फ्रेंडली कारची विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी आपल्याकडे लक्झरी कारची क्रेझ काही कमी नाही. आजही रस्त्यांवरून एखादी लक्झरी कार जाताना दिसली की अनेकांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात. भारतात अनेक श्रीमंत लोकं आहेत, ज्यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत.
खरंतर प्रत्येकाचे स्वप्न असते की त्यांची एक आलिशान कार असावी. पण प्रत्येकाला अशा महागड्या कार विकत घेणं परवडत नाही. देशात असे काही मोजकेच उद्योगपती किंवा सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे खूप महागड्या आणि आलिशान कार आहेत.
जर तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या कार कोणाच्या मालकीच्या आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊया भारतातील सर्वात महागड्या कार कोणत्या आहेत आणि त्या कोणाच्या मालकीच्या आहेत.
भारतातील सर्वात महागडी कार बेंटले मुल्सेन ईडब्ल्यूबी आहे, जी एक सुपर लक्झरी सेडान आहे. या आलिशान कारचे मालक व्हीएस रेड्डी आहेत, जे ब्रिटिश बायोलॉजिक्सचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. जेव्हा ही कार डिलिव्हर करण्यात आली तेव्हा तिची किंमत सुमारे 14 कोटी रुपये होती. या लक्झरी कारमध्ये 6.75 लिटरचे V8 इंजिन आहे जे 506 एचपी आणि 1020 एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
आपण भारतातील सर्वात महागड्या कार आणि त्यांच्या मालकाबद्दल जाणून घेत आहोत आणि त्यात अंबानी कुटुंबाचा समावेश नसेल हे शक्य नाही. भारतातील दुसरी सर्वात महागडी कार रोल्स रॉयस फॅंटम सिरीज VIII EWB आहे, ज्याची ऑन-रोड किंमत तब्बल 13 कोटी 50 हजार रुपये आहे.
या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, कारला पॉवर देण्यासाठी 6.75-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V12 इंजिन बसवण्यात आले आहे, जे जास्तीत जास्त 563bhp आणि ९००nm टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त 5.4 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग गाठू शकते.
तिसरी कार रोल्स रॉयस घोस्ट ब्लॅक बॅज आहे, ज्याची किंमत 12 कोटी 25 हजार रुपये आहे. ही कार बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या मालकीची आहे. रोल्स-रॉइस ब्लॅक बॅज घोस्टमध्ये 6.75-लिटर V12 इंजिन असेल, जे स्टॅंडर्ड कारपेक्षा सुमारे 29hp जास्त पॉवर आणि 50 Nm जास्त टॉर्क जनरेट करते. ब्लॅक बॅज घोस्टचे इंजिन एकूण 600 पीएस पॉवर आणि 900 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात ZF 8-स्पीड गिअरबॉक्स असेल. या कारचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे. ही कार 4.6 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते.
चौथी कार मॅकलरेन 765 एलटी स्पायडर आहे, जी हैदराबादचे प्रसिद्ध उद्योगपती नसीर खान यांच्या मालकीची आहे. या गाडीची किंमत 12 कोटी रुपये आहे. नसीर एक उद्योजक आणि व्यावसायिक आहे. लक्झरी कारच्या प्रेमींमध्ये नसीरचे नाव सर्वात आधी घेतले जाते. याआधीही त्यांनी त्याच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान कार पार्क केल्या आहेत.
पाचवी कार मर्सिडीज-बेंझ एस600 गार्ड आहे जी मुकेश अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या आलिशान कारची किंमत 10 कोटी रुपये आहे.