राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या वाट्याला असलेल्या सहा जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. महाविकास आघाडी म्हणून सगळ्या आमदारांची मते आपल्याला द्यावीत, अशी जाहीर भूमिका घेत संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी केलेली ‘स्वराज्य’ संघटना स्थापनेची घोषणासुद्धा महत्वाची आहे. छत्रपतींनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेत राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडीवर मतांसाठी त्यांनी दबाव निर्माण केला आहे, असे वरकरणी दिसत हाेते. छत्रपतींचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी घेतलेली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट, शरद पवार यांनी तातडीने त्यांना जाहीर केलेला पाठिंबा आणि त्यानंतर शिवसेनेने घेतलेली विरोधातील भूमिका यामुळे गेल्या आठवडाभर राजकारण ढवळून निघाले.
छत्रपती संभाजीराजे हे जरी राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, तरीही त्यांना भाजपनेच हा सन्मान दिला होता, हे स्पष्ट आहे. त्यावेळी संभाजीराजे यांची फडणवीस किंवा भाजपशी होणारी मैत्री राष्ट्रवादीला खटकली होती. त्यातूनच पूर्वी फडणवीसांची नियुक्ती छत्रपती करायचे, आणि छत्रपतींची नियुक्ती फडणवीस करताहेत, हे शरद पवार यांचे विधान खूप काही सांगणारे होते. छत्रपतींनी मराठा मोर्चामध्ये घेतलेला सक्रीय सहभागसुद्धा महत्वाचा ठरला होता. छत्रपती हेच मराठा समाजाचे एकमेव नेते, असे चित्र या दरम्यान तयार झाले होते. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आणि ते फडणवीसांना भेटायला गेले. या भेटीनंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची आणि स्वराज्य संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर लगेच शरद पवार यांनी संभाजीराजेंना राष्ट्रवादीची उर्वरित मते देण्याचे जाहीर केले, आणि इथूनच राजकारण सुरु झाले.
शिवसेनेचा दुसरा उमेदवार रिंगणात उतरेल आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा धर्म पाळावा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. संभाजीराजेंना उमेदवारी देण्यास तयारी दर्शवतानाच शिवसेनेने संजय राऊतांची उमेदवारी पहिले जाहीर केली, आणि छत्रपतींना पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजे सगळ्यांनाच हवे आहेत, पण आपापल्या शर्तींवर. तर संभाजीराजेंना मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून पुढे येण्याची महत्वकांक्षा आहे. त्यांना एका राजकीय पक्षाशी बांधिलकी नकोय. आपले नेतृत्व अधिक व्यापक व्हावे, यासाठीचा त्यांचा प्रयत्न असावा. कारण छत्रपतींना राजकीय पक्षांचे काही वावडे नाही. वेगवेगळी राजकीय बांधिलकी त्यांनी त्या – त्यावेळी पाळली आहे. राज्यात लाखांचे मराठा मोर्चे निघत असताना राजकीय नेत्यांना दूर ठेवण्याची भूमिकाच या मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी घेतली होती. त्या भूमिकेमुळेच ठराविक राजकीय पक्षाशी बांधिलकी नसल्याने संभाजीराजेंचे नेतृत्व या मोर्चांनी मान्य केले. मराठा समाजाचे शक्तीप्रदर्शन या मोर्चांच्या माध्यमातून झाले. राजकीय व्यासपीठावर न जाता सामाजिक नेतृत्व मोठा दबाव निर्माण करू शकते, हा संदेश मराठा मोर्चांनी दिला.
पक्षविरहित राजकारण करताना समाजकारण करत मराठा समाजाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न संभाजीराजे करणार असावेत, असा एक अंदाज लावला जाऊ शकतो. पण त्यासाठी महाविकास आघाडीने आपल्या अपक्ष उमेदवारीला समर्थन द्यावे, ही अट का? हाच प्रश्न काही शंका निर्माण करणारा होता. संभाजीराजेंची उमेदवारी ही भाजपची खेळी असल्याचे म्हणूनच म्हटले जात होते. काहीही असले तरीही पेचात शिवसेना अडकली आहे. प्रतिष्ठेचा मुद्दा करत कोल्हापूरचेच संजय पवार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा प्रफुल्ल पटेल राज्यसभेत जातील. काँग्रेसचेही नाव येत्या दोन दिवसात निश्चित केले जाईल. महाविकास आघाडीकडे पुरेशी मते असतानाही संभाजीराजेंना उमेदवारी दिली नाही, किंवा शिवसेनेने त्यांना सशर्त उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला, हा संदेश मात्र या डावपेचांमधून पोहचवला गेला. मराठा क्रांती मोर्चा आणि युवकांच्या इतर मराठा संघटनांना संभाजीराजेंना उमेदवारी नाकारण्याचा प्रकार रुचलेला नाही. संभाजीराजे राज्यसभेत बिनविरोध जायला हवेत, अशी या तरुणांची भावना आहे. पण इथे तर त्यांच्या उमेदवारीचीच अडचण होती.
भाजपकडे तिसरा उमेदवार म्हणून संभाजीराजेंना निवडून आणण्यासाठी पुरेशी मते नाहीत. तरीही तिसरी जागा लढवण्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवा मुद्दा चर्चेला दिला आहे. या निवडणुकीत मतांची पळवा – पळवी करणे शक्य नाही. कारण ओपन वोटींगची पद्धत आहे. पक्षप्रतोदाला दाखवूनच मत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाजपकडे उर्वरित २९ मतांना जोड मिळण्याची शक्यता कमीच आहे. महाविकास आघाडीकडे असलेल्या अपक्षांच्या मतांवर त्यांची भिस्त असू शकते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करेल, या अफवा आहेत. महाविकास आघाडी कायम रहावी आणि वाद आपसात मिटावा, यासाठी नाराजी असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारालाही मदत केली जाईल, हे नक्की. पण मग छत्रपतींच्या उमेदवारीमुळे समोर आलेला प्रश्न कायमच राहतोय.
शिवसेनेने संजय पवार यांच्या उमेदवारीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे यू टर्न घेणे शिवसेनेला अवघड आहे. महाविकास आघाडीच्या सूत्राविरुद्ध राष्ट्रवादी जाणार नाही. काँग्रेसने तर भूमिका स्पष्टच केली आहे. भाजप राज्यसभेसाठी कोणताही धोका पत्करु शकत नाही. अशा परिस्थितीत संभाजीराजेंना पराभव स्वीकारावा लागला तर मराठा समाजात नाराजी पसरेल, आणि संभाजीराजेंना पराभूत केल्याचे खापर शिवसेनेवर फुटेल, हे समिकरण मांडले जात होते. मग भाजपकडून एक जागा संभाजीराजेंना दिली जाईल का, याचीही चर्चाही सुरु होती. सगळ्या घडामोडींची गोळाबेरीज पाहता यावेळी सहाव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीतील पेचांमध्ये कोण अडकेल आणि कोण हा पेच सोडवण्यात यशस्वी होईल, याची उत्सुकता असतानाच संभाजीराजेंनी निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यसभेत जाण्याचा त्यांचा मार्ग सध्यातरी खुंटला आहे. मात्र त्यांना पुढच्या काळात भाजपकडूनच संधी दिली जाईल, असा अनेकांचा होरा आहे.
विशाल राजे
vishalvkings@gmail.com