येत्या ७ जून रोजी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचे नवे पुस्तक ‘गांजले ते गाजले!’चे प्रकाशन अशोक मुळ्ये यांच्या डिंपल प्रकाशनतर्फे होत आहे. गेल्याच महिन्यात त्यांना मानाचि संघटनेतर्फे लेखन कारकिर्द सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राज्यशासनाच्या सांस्कृतिक गौरव पुरस्काराचेही ते मानकरी याच काळात झालेत. त्यांच्याच विक्रविक्रमी ‘वस्त्रहरण’ नाटकात मध्यवर्ती तात्या सरपंचाच्या भूमिकेत ते २३ एप्रिलला रवींद्र नाट्यमंदीरात रसिकांपुढे प्रगटले सन्मान, सत्कार, मुलाखती, लेखन, एकपात्री आणि रंगभूमीवर भूमिका – यात पूर्ण बिझी असलेले गवाणकर म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. कारण हा उत्साह, उर्जा त्यांच्यात चक्क वयाच्या ८३ वर्षी संचारलीय! जी भल्याभल्यांना, तरुणाईलाही थक्क करून सोडणारी…
ज्यांच्या सोबतच भेटीसाठी, गप्पांसाठी आजही मुंबई – ठाणे – पुण्यात जणू ‘वेटींग लिस्ट’ जशी लावण्यात येते. कारण त्यांच्याकडे असलेले एकेक किस्से हे सर्वांनाच खूप काही सांगून जातात. दिशादर्शक ठरतात. म्हणूनच मित्रांचा गोतावळा त्यांच्यासोबतच्या मैफिलींसाठी आतुरलेला असतो.
ज्या पायरीचा आधार घेऊन आपण पुढची पायरी गाठतो, त्यावेळी पहिल्या पायरीला कधीच विसरायचे नाही. कारण त्या पायरीचा आधार जर घेतला नसता तर पुढील पायरी ही कधीच पार पाडू शकलो नसतो. उंचीवर पोहचू शकलो नसतो. हे तत्व प्रामाणिकपणे त्यांच्यातल्या कलाकाराने जपलेले दिसते. आजही वयाची पर्वा न करता त्यांच्यातला तात्या सरपंच असो वा लेखक – हा कायम जमिनीवरल्या पहिल्या पायरीशी प्रामाणिक असल्याचे सिद्ध करतोय.
‘मानाची’च्या संवादात त्यांनी तोच मुद्दा आपल्या मोकळ्या ढाकळ्या शैलीत नुकताच मांडला. कलेनेच मला जिवंत ठेवलं असं त्यांनी सांगितलं. राजापूरच्या माडबन गावातून मुंबईत आल्यावर कष्टात बालपण त्यांचे गेले. फूटपाथवर, स्मशानात, चाळीत, ओसरीवर जिथे जागा मिळेल तिथे राहून शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं; पण बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची, नाटकाची आवड. एका गॅरेजमध्ये गाड्यांच्या पट्ट्यावर क्रमांक लिहीण्याचे काम केले. त्याचे जेमतेम दोन आणे मिळायचे. त्यांचे त्यात अक्षर वळणदार. कामं मिळत गेली. रोजचा खर्च, खाणंपिणं त्यात जमलं.’आई-वडिलांचा आशीर्वाद! हॉर्न प्लीज, थँक्यू, कुलस्वामिनीची कृपा, जय महाराष्ट्र’ – ही अक्षरेही ते गाड्यांवर लिहू लागले त्याचे आणखीन दोन रुपये मिळायचे. चित्रकारितेतल्या अक्षरलेखनाने त्यातील कला विकसित झाली. कलेनेच त्यांना या प्रवासात जिवंत ठेवले.
रात्रशाळेतलं शिक्षण. ११वी परीक्षा उत्तीर्ण – यासाठी सांताक्रुझ विमानतळावरही त्यांनी काम केले. बालमजूर म्हणून पडेल ते कष्ट सोसले. धूणीभांडी घासण्यातही लाज वाटू दिली नाही. एसएससीनंतर पोस्टातली नोकरी आणि त्या आधारावर, जोरावर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. पण या प्रवासात त्यांच्यातला कलाकार प्रत्येक टप्प्यावर जिवंत होता.
संघर्ष करीत त्यांच्यातला कलाकार हा ९६व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानापर्यंत पोहचला. ते साल २०१६ होते. ठाण्यातल्या नाट्यसंमेलनात महाराष्ट्रभरातील चाहत्यांनी त्यांच्या या सन्मानासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येकालाच आपल्या घरातलाच माणूस या पदापर्यंत विराजमान झाल्याची भावना होती. बहुदा नाट्यसंमेलनातल्या परंपरेतल हे तसं भव्य – दिव्य संमेलन होतं. की ज्याचे संमेलनापूर्वी पंधरा एक दिवस ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून गवाणकरांनी बोलीभाषेतल्या नाटकांची स्पर्धा राज्यशासनाने आयोजित करावी, अशीही मागणी केली होती. पण त्याची पूर्तता दोनचार सरकार बदलले तरी अजूनही झालेली नाही, हे आपले दुर्दैवच! फक्त मुंबईत कै. गोविंद चव्हाण यांनी प्रारंभ केलेली एकांकिका स्पर्धा ही बोलीभाषिकांना आपल्या कलाकृती सादर करण्यासाठी चालू आहेत, तेवढेच एक समाधान. अजूनही वेळ गेलेली नाही, राज्यशासन आणि नाट्यपरिषद यांनी यावर गंभीरपणे विचार करावा, ही अपेक्षा. बोलीभाषेचं मार्केटिंग करणं ही आज काळाची गरज आहे.
ज्या बोलीभाषेतल्या ‘वस्त्रहरण’ने नाटकाने विश्वविक्रम केला त्या नाटकाचे पहिले ६० प्रयोग पूर्ण तोट्यात होते. नाटक बंद करण्याचा निर्णयही झाला होता. पण १९८० साली पुल देशपांडे यांनी नाटक बघितले आणि नाटकाचं नशीबच बदलले. त्यांनी गवाणकरांना एक पत्र पाठविले होते. जे आजही त्यांनी जपून ठेवलय. त्यात साक्षात पुलं म्हणतात – ‘हे नाटक बघण्यापेक्षा या नाटकात मला एखादी छोटीशी का होईना भूमिका करायला मिळाली असती तर मी भाग्यवान ठरलो असतो!’ ही प्रतिक्रिया ‘वस्त्रहरण’ नाटकाची ताकद व श्रेष्ठत्व सिद्ध करणारी आहे.
माझी झालेली गवाणकरांची प्रत्येक भेट त्यांच्याशी जवळीक वाढविणारी ठरलीय. गेली चाळीसएक वर्षे त्यांना जवळून बघण्याचा योग कुंडलीत जुळून आलाय. दैनिक ‘सामना’त उत्सव पुरवणी संपादन करीत असताना साडेतीन वर्षे प्रत्येक आठवड्यात त्यांच्या भेटीगाठी, संवाद होत होता. ‘ऐसपैस’ हे त्यांचे सदर त्यावेळी तुफान गाजले. वाचक त्यांच्या लिखाणावर फिदा होते. अनेकांची व्यक्तिचित्रे, घटना, प्रसंग, किस्से याने ‘ऐसपैस’ वाचकप्रिय झाले. पुढे ‘डिंपल’ प्रकाशनने त्यांचे सुंदर पुस्तकही प्रसिद्ध केलं! ‘ऐसपैस’पूर्वी ‘मुंबई सकाळ’मध्येही त्यांची ‘व्हाया वस्त्रहरण’ ही मालिका होती. त्यामागोमाग ‘ऐसपैस’ सुरू झाले. रविवार सकाळ म्हणजे सकाळपासूनच गवाणकरांचे कौतुक करणारे फोन त्यांना घरी खणखणायचे. त्याचेही अनेक किस्से आहेत. ‘स्तंभलेखक’ म्हणून त्यांच्या येवढा वक्तशीर लेखक दुसरा नाही. हे अनुभवावरून मी सांगू शकतो. आपल्या मातीशी असलेली पक्की नाळ आणि त्याला असलेला माणुसकीचा स्पर्श ही त्यांच्या लेखनाची ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागती गवाणकरांच्या नाटकांमध्ये ‘व’ ला प्राधान्य दिसतय. त्याचं गुपित काय ते अजूनही त्यांनी तसं उघड केलेलं नाही. ‘वस्त्रहरण’ वेडी माणसं, वन रूम किचन, वात्रट मेले, वर भेटू नका, वरपरीक्षा, वडाची साल पिंपळाला, विठ्ठल- विठ्ठल यात ‘व’ प्रत्येक नाटकाचा पहिला शब्द आहे! हा एक योगायोगही असावा. असो.
मराठी माणूस आणि त्याचं नाट्यवेड हे जगजाहिर आहे. आज मनोरंजनाची अनेक दालने ही घरापर्यंत पोहचली असली तरीही नाट्यगृहात जाऊन मराठी माणूस नाटक बघतोय. जगाच्या पाठीवर हा प्रकार तसा चक्रावून सोडणारा आणि थक्कही करणारा आहे. या विषयावर गवाणकरांना छेडले असता ते म्हणाले, ‘नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की, ‘दारू ही प्यायच्या अगोदरच सुटते त्यानंतर मात्र त्याची सुटका नाही!’ आमचा नाटक धंदाही असाच आहे. या धंद्यात एकदा का माणूस उतरला की मग तो तोंडाला रंग लावलेला रंगकर्मी असो की व्यवस्थापक, निर्माता, तंत्रज्ञ असो. त्याची रंगभूमीकडे पावले ही वळणारच! नाट्यसंमेलनाचे पहिले संमेलनाअध्यक्ष दादासाहेब खापर्डे म्हणाले होते की, नाटक एक पवित्र धंदा आहे!’ त्यात जरा पुढे जाऊन मला असं म्हणावसं वाटतं की नाट्यव्यवसाय हे एक पवित्र व्यसन आहे!’ – यातच सारं काही आलं. ज्याकाळात परदेशी नाटकांचा दौरा अपवादाने होत होता. दौऱ्याच्या वाटेवर संकटांची मालिका उभी असायची. आज काळ बदलला आहे, पण ‘वस्त्रहरण’च्या दौऱ्याच्या आठवणी म्हणजे आणखीन एक ‘नाटकात नाटक’ सहज रंगतदार होईल! यात शंका नाही.
गवाणकरांची अनेक पुस्तके, नाटके प्रसिद्ध झालीत. काहींच्या तर आवृत्त्यांवर आवृत्त्याही निघाले आहेत. त्यांचे ‘व्हाया वस्त्रहरण’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तकही विक्रमी ठरले. वाचकांनी त्याला नाटकाप्रमाणेच ‘हाऊसफुल्ल’ ठरविले. हे स्वगतात्मक असलेले कथन म्हणजे मालवणी माणूस हा स्वतःकडेच, त्याच्या दुःखाकडे कसा मिश्किलतेने बघतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अशी शैली त्यात आहे. यातले अनेक प्रसंग आहे हसवितांनाच रडवतातही. मराठी साहित्यात ‘व्हाया वस्त्रहरण’ने एक मानाचे स्थान निर्माण केलय. ‘नवाकाळ’कार नीलकंठ खाडीलकर यांच्यापासून ते मधु मंगेश कर्णिकांपर्यंत आणि मंगेश पाडगावकरांपासून ते पु.ल.देशपांडे यांच्यापर्यंत साऱ्यांनीच गवाणकरांच्या लेखनाचे कौतुक केलय. शेकडो वाचक, प्रेक्षकांच्या स्वप्नांना पंख देणारी त्यांची लेखणी कायम खुणावत राहतेय. पु.ल.देशपांडे आणि गवाणकर यांच्यात ‘वस्त्रहरण’ नाटकामुळे एक जिव्हाळ्याचं नातं जुळून आलं होतं. गवाणकरांच्या प्रत्येक वाढदिवसाला पुलंचे बोल आठवतात, पुलं म्हणतात – ‘वस्त्रहरण’च्या रूपाने गवाणकरांनी मराठी रंगभूमीला देशी फार्सचे भरजरी वस्त्र अर्पण केले आहे. ‘वस्त्रहरण’ नाटक म्हणजे शंभर टक्के देशी फार्सच! मालवणच्या सिंधुदुर्गाइतकेच त्यांच्या मालवणी नाटकाला दीर्घायुष्य लाभो आणि लक्षावधी रसिकांना खळखळून हसायला लावण्याचे पुण्य त्यांच्या पदरात पडत राहो, ही शुभेच्छा!’
पुलंची ही शुभेच्छा सत्य ठरलीय, कारण वय वर्षे ८३ मध्येही ‘गवाणकर’ आणि ‘वस्त्रहरण’ या दोघांना दीर्घायुष्य लाभलेले आहे! हा एक चमत्कारच म्हणावा लागेल!
जाता जाता : नाट्यक्षेत्रात जागतिक विक्रमाने गाजलेल्या या ‘मालवणी सम्राटा’ला केंद्रशासनाने आता तरी ‘पद्मश्री’सारख्या पुरस्काराने सन्मानित करावे ही अपेक्षा.
– संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com