एका पस्तीस वर्षे जुन्या प्रकरणात नवज्योत सिंग सिद्धू यांना न्यायालयाने गेल्या वर्षीच्या मे महिन्यात एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांची दहा महिन्यांतच सुटका झाली आहे आणि आता पंजाब काँग्रेस आणि सिद्धू यांचे भवितव्य काय हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. गेल्याच वर्षी त्या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसमधील बेदिली स्पष्ट झाली होती. याचे कारण काँग्रेस प्रदेश संघटनेत सिद्धू यांचा वरचष्मा ठेवण्याचा अट्टाहास.
प्रथम अमरिंदर सिंग यांच्याशी सिद्धू यांचे अत्यंतिक मतभेद होते. काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धू यांच्या आहारी जाऊन अमरिंदर सिंग यांना नाराज केल्याने ते पक्षाबाहेर पडले आणि भाजपशी त्यांनी सलगी केली. त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळेल अशी सिद्धू यांची अपेक्षा होती. काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धू यांच्या त्या आशेवर पाणी फेरले आणि दलित समाजाच्या मतांची बेगमी करण्याच्या उद्देशाने चरणजित सिंग चन्नी यांना धुरा सोपविली. मात्र त्यानेही नाराज झालेल्या सिद्धू यांनी प्रदेशशध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा पवित्रा घेतला.
तो पक्ष श्रेष्ठींच्या सूचनेवरून जरी त्यांनी मागे घेतला तरी चन्नी यांच्यावर शरसंधान करण्याची एकही संधी त्यांनी स्वतः त्याच पक्षात असूनही सोडली नाही. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (आप) झंझावातासमोर अन्य सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला आणि सत्ताधारी असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला १८ जागा आल्या. त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी अन्य काही प्रदेशाध्यक्षांसह सिद्धू यांचाही राजीनामा घेतला होता आणि अमरिंदर सिंग ब्रार (राजा वॉरिंग) यांची पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली होती. त्यानंतर काहीच महिन्यांत सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. ते आता बाहेर आले आहेत. या पार्श्वभूमीवर सिद्धू यांची काँग्रेसमध्ये नवी भूमिका काय असेल आणि त्या अनुषंगाने पंजाब काँग्रेसचे भवितव्य काय याचा वेध घेणे गरजेचे.
याचे महत्वाचे कारण म्हणजे अर्थातच वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असूनही पंजाबात काँग्रेसने तेरापैकी तब्बल ८ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ विधानसभा मतदारसंघांच्या हिशेबात ६९ जागा. मात्र त्यानंतर २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १८ जागांवर समाधान मानावे लागले.
आता सिद्धू यांनी तुरुंगाबाहेर आल्यावर राहुल गांधी यांची भलामण केली आहे; ती बहुदा आपल्याला पक्ष संघटनेत पुन्हा महत्वाचे पद मिळावे या हेतूनेही असू शकते. तेव्हा सिद्धू यांच्या महत्वाकांक्षा पुन्हा उफाळून येणार यात शंका नाही. प्रश्न काँग्रेस हा विषय कसा हाताळते हा आहे. याचे कारण सिद्धू यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊन जेमतेम वर्ष उलटले आहे. अशा स्थितीत लगेचच पुन्हा सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येईल याची शक्यता कमीच. तसे केले तर काही नेत्यांनी भाजपची वाट धरल्यानंतर आता कुठे सावरत असलेल्या पंजाब काँग्रेस संघटनेत पुन्हा अस्वस्थता पसरेल.
पक्ष संघटनेला लगेचच सिद्धू वेठीस धरतील या आशंकेने असेलही पण राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या विरोधात पंजाब काँग्रेसने पतियाळात निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. ते बदलून तो मोर्चा भटिंडा येथे आयोजित करण्यात आला. पतियाळा म्हणजे सिद्धू यांचे कार्यक्षेत्र. तेथे सिद्धू लगेचच प्रकाशझोत स्वतःवर घेतील अशी भीती पंजाब काँग्रेसच्या नेत्यांना वाटली असल्यास नवल नाही.
सिद्धू यांच्या सुटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे स्वागत वाजत गाजत केले असले तरी तीच भावना काँग्रेस नेत्यांची आहे का, हे छातीठोकपणे सांगता येणार नाही. अमरिंदर सिंग ब्रार यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमण्यात आले तेव्हाही सिद्धू नाराजच होते आणि त्यांनी ती नाराजी लपवलेली नव्हती. त्यातच ब्रार हे सिद्धू यांच्या तुलनेत नवखेच.
तेव्हा आता सिद्धू यांची सुटका झल्यानंतर सिद्धू पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय होतील आणि ब्रार यांची डोकेदुखी वाढेल याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र या संघटनात्मक कुरघोड्यांच्या नादात सिद्धू यांनी पंजाबात अमृतपाल सिंगच्या प्रकरणाने तापलेल्या वातावरणात संयत भूमिका घेणेही आवश्यक. त्यासंबंधी प्रश्नावर सिद्धू यांनी थेट भाष्य केलेले नसले तरी पंजाबात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे षडयंत्र रचले जात आहे असे सांगून त्यांनी त्याच प्रकरणाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरही त्यांनी शरसंधान केले आहे आणि ते फक्त बाहुले आहेत अशा स्वरूपाचे उद्गार त्यांनी काढले आहेत. हे सगळे काँग्रेस संघटनेत चैतन्य निर्माण करण्याच्या आणि त्याहीपेक्षा आपल्या पुनरागमनाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने असेलही. मात्र अमृतपाल सिंग प्रकरणावरून सर्वच पक्षांनी प्रतिक्रिया देताना संयम पाळला पाहिजे आणि सिद्धू यांना पक्ष श्रेष्ठींनी तशा सूचना देणे आवश्यक. मात्र कळीचा मुद्दा हा सिद्धूच्या पुनरागमनापेक्षाही त्यांची यापुढे काँग्रेसमध्ये नक्की भूमिका काय, हा आहे.
काँग्रेसची पहिली कसोटी आता जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत असेल. काँग्रेस खासदार संतोख सिंग यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान आकस्मिक निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आणि आता येत्या १० मे रोजी तेथे मतदान होईल. ही जागा राखणे हे काँग्रेसमोरील आव्हान असेल. तेथे काँग्रेसने संतोख सिंग यांच्या पत्नीला उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. मात्र तरीही प्रचारात सिद्धू किती सहभागी होतात हे पाहणे औत्सुक्याचे.
सिद्धू यांना आपल्या लोकप्रियतेची जाणीव अवश्य आहे आणि पक्षात आपल्याला त्यानुसारच मानाचे पद मिळायला हवे अशी त्यांची सदोदितची महत्वाकांक्षा असते. तथापि एवढे लोकप्रिय असूनही २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्व मतदारसंघात आपला पराभव का झाला आणि पक्षाला देखील इतक्या दारुण पराभवाला सामोरे का जावे लागले, याचेही आत्मपरीक्षण सिद्धू यांनी करावयास हवे. पक्ष सिद्धू यांना अन्य राज्यांतील निवडणूक प्रचारासाठी पाठवू शकतो अशीही वृत्ते आली आहेत; मात्र आपल्या विधानांनी आणि हेकेखोरपणाने पंजाबतच काँग्रेसला सातत्याने अडचणीत आणलेल्या सिद्धू यांना अन्य राज्यांत पाठवून काँग्रेस धोका स्वीकारेल का हाही महत्वाचा मुद्दा.
नवज्योत सिंग सिद्धू यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा पंजाबात आली असताना सिद्धू कारागृहात होते. मात्र सिद्धू यांना पक्षात नवी भूमिका मिळेल असे सूतोवाच त्यावेळी राहुल गांधी यांनी केले होते. ही नवी भूमिका नक्की कोणती हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
आपल्या पूर्वीच्या चुकांवरून बोध घेऊन सिद्धू पक्षात आपल्या लोकप्रियतेच्या बळावर चैतन्यच उत्पन्न होईल; धुसफूस नव्हे याची काळजी घेऊ शकतात. तथापि पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा धुसफूस निर्माण होते की २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना पंजाबातील पक्ष संघटन एकदिलाने सामोरे जाते हे सिद्धू आपल्या अवाजवी महत्वाकांक्षा किती आटोक्यात ठेवू शकतात आणि काँग्रेस श्रेष्ठी सिद्धू यांना कितपत मुभा देतात या तारतम्यावर अवलंबून आहे.
राहुल गोखले
rahulgokhale2013@gmail.com