राज्यातील शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाने पक्षावरच दावा केला आहे. आमची शिवसेना हाच खरा पक्ष आणि बाळासाहेबांच्या विचारांचे आम्हीच खरे वारस. अगदी रामदेव बाबांच्याही तोंडून बाळासाहेबांच्या विचारांचे खरे पाईक शिंदेच असल्याचेही वदवून घेण्यात आले. त्याने सर्वसामान्य मतदारांवर आणि पदलोलूप नसलेल्या सर्वसामान्य शिवसैनिकांवर किती परिणाम होईल, हे सांगणे म्हणजे पतंजलीच्या गोमूत्राने सगळेच रोग कसे बरे होतात, हे सांगण्याइतके कठीण. पण सगळ्याच बाजूने चर्चेचे, कुजबुजीचे रान उठवण्याची भाजपची पद्धत, शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची हे ठरवण्यासाठीही उपयोगात आणली जात आहे, हेच यावरुन स्पष्ट होते.
भाजप विरोधकांमध्ये रामदेवबाबा विनोदाचा विषय आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे परिणाम दिसणार नाहीत, पण या विषयाची चर्चा नवनव्या व्यासपीठावर घडवून आणण्याचा भाजपचा प्रयत्न उधृत होतो. विधिमंडळाच्या सभागृहातसुद्धा बंडाचे सूत्रधार म्हणून ज्यांना भाजपने वारंवार श्रेय दिले, त्या एकनाथ शिंदेंना आपल्या भूमिकेचे अनेकदा समर्थन करावे लागले. तर आपण साधे असतो, तर एवढा मोठा कार्यक्रम केलाच नसता, असे सांगत आपणही राजकारणातील कसलेले कलाकार आहोत, हे आपल्याच तोंडाने सांगावे लागले.
शिंदे म्हणाले तसे ते पट्टीचे राजकारणी असतील तर मग भाजप आणि शिंदे मिळून ठाकरे गटाच्या शिवसेनेला पूर्णपणे हतप्रभ करू शकतात. पण… ते शक्य दिसत नाही. शिंदे गटाला राजकीय यश मिळवायचे असेल, किंबहुना ठाकरेंना संपवायचे जरी असेल तरीही त्यांना ठाकरेंचीच सोबत लागणार आहे. ती त्यांची अपरिहार्यता आहे.
महाराष्ट्रात ‘ठाकरे’ हा राजकीय ब्रॅण्ड आहे. प्रबोधनकारांच्या पिढीपासून रुजलेला हा ब्रॅण्ड बाळासाहेबांनी सर्वोच्च स्थानी नेला. महाराष्ट्रातील तत्कालिन मराठा प्रभावाच्या राजकारणात अगदीच अल्पसंख्याक असलेल्या बाळासाहेबांनी समाजकारणाशी राजकारण जोडले. बहुजनांमधील अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित करत शिवसेनेचा भगवा मंत्रालयापर्यंत फडकवला.
सत्ता मिळवून देणारा तरीही सत्तेपासून फटकून वागणारा नेता म्हणून, सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून बाळासाहेबांची प्रतिमा प्रत्येक घराघरात प्रभाव निर्माण करणारी ठरली. सरकार असले तरीही आपला नेता आपल्या मनातले बोलतो, सरकारला सुनावतो ही भावना तमाम शिवसैनिकांना आनंद देणारीच होती. त्यामुळेच कोणी आले आणि कोणी सोडून गेले तरीही बाळासाहेबांचे सिंहासन अढळ होते. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांची प्रतिमा कायम होती, ती आजही शिवसैनिकांमध्ये तशीच आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सत्तेतील प्रत्यक्ष सहभागामुळे त्यांना शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांसारखी प्रतिमा टिकवता आली नाही आणि त्यानंतरचा सगळा इतिहास सगळ्यांसमोर आहे. पण आजही सत्तेपासून, सत्ताकारणापासून फटकून असणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभा नाही. ८० टक्के समाजकारणाचे बाळकडू मिळालेला तो शिवसैनिक केवळ मतदान केंद्रापर्यंत मतदारांना नेण्यातच २० टक्के राजकारण आहे, असे मानतो.
निरपेक्षपणे शिवसैनिक असल्याचा अभिमान बाळगणारा हा शिवसैनिक म्हणूनच कधी भुजबळांच्या मागे गेला नाही, कधी राज ठाकरे किंवा नारायण राणे यांच्याही मागे उभा राहिला नाही. तोच सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांया पाठीशी ठामपणे उभा आहे. अर्थात तो अस्वस्थ, अपमानित, संतप्त आहे पण केवळ बाळासाहेबांमुळे तो आपल्या भूमिकेवर कायम आहे. हाच शिवसैनिक येणार्या मुंबई महापालिका आणि राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणुकीत आव्हान उभे करणार आहे, याची जाणीव शिंदे गटाला आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर जाण्यास आणि धनुष्यबाण आपल्यालाच मिळावे, यासाठी शिंदे गटाला आटापिटा करायला लावण्यास हाच कट्टर शिवसैनिक कारणीभूत आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्याही आधी आदित्य राज्याच्या दौर्यावर निघाले. सरकारात असताना आदित्य ठाकरे हे उद्धव यांच्यापेक्षाही अधिक सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी, माध्यमांसाठी नॉट रिचेबल होते.
एकंदरीत ट्विटर नेते म्हणूनही त्यांचा उल्लेख व्हायचा. पण हेच ट्वीटर नेते पाहण्यासाठी राज्यातील अनेक भागात गर्दी गोळा झाली. त्यांच्या भाषणांमुळे नाही पण पुन्हा ठाकरे सामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहचाहेत या संदेशामुळे जुने शिवसैनिक मळभ झटकून तरतरीत झालेत. उद्धव ठाकरे हेसुद्धा राज्यात दौरा करणार आहेत, असे म्हणतात. त्यांना लोकांना भेटावेच लागणार आहेत. आजूबाजूचे लोक कितीही असले तरीही शिवसैनिकांना ठाकरेंच्या हाताचा स्पर्श हवा असतो.
गेल्या काही वर्षात बडव्यांमुळे शिवसैनिक त्या स्पर्शाला पारखे झाले. ज्या दिवशी उद्धव ठाकरे घरातून बाहेर येतील, शिवसैनिकांशी बाळासाहेबांप्रमाणे संवाद करतील, त्या दिवशी मरगळलेली शिवसेना पुन्हा टवटवित होईल. हे ठाकरेंपेक्षाही अधिक शिंदेंना आणि भाजपला माहिती आहे. त्यामुळेच शिंदेंना सत्तेचा कितीही लाभ दिला तरीही महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचे नेतृत्व राज्यासाठी आणि उपयोगिता भाजपसाठी सिद्ध होईल.
ठाकरेंशिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे माहिती असल्यामुळेच भाजपला राज ठाकरेंची साथ हवी आहे. ठाकरेंचा पर्याय म्हणून शिंदे असू शकत नाहीत, हे जसे भाजपला माहिती आहे तसेच ते शिंदेंनाही ठाऊक आहे. ठाकरेंची रिप्लेसमेंट ठाकरेच असू शकतात, हे स्पष्ट आहे, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या राज ठाकरे भेटींना महत्व आहे. राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधायचा डाव टाकला जाणार आहे.
राज ठाकरे उघडपणे किंवा कदाचित अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला आणि भाजपच्या अजेंड्याला साथ देतील, कारण त्यांनाही सध्या जनाधारासाठी एक भक्कम आधार हवा आहे. शिवाय राज यांनी उद्धव यांच्यावर केलेल्या टिकेमुळे शिवसैनिक दुखावला जात नाही. त्याचे मतपरिवर्तन होऊ शकते, हे काही निवडणुकीत अनुभवायला मिळाले आहे.
पण इतरांनी ठाकरेंवर टीका केली तर मात्र शिवसैनिक एकजूट होतो. ही एकजूट होऊ नये, यासाठी ठाकरेच लागतील. अखेर शिंदे आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळवायचे असेल तर ब्रॅण्ड ठाकरेशिवाय त्यांना पर्याय नाही, ही आता ‘राज की बात’ राहलेली नाही.
-विशाल राजे