संत ज्ञानेश्वरांनी निंबाचिया झाडे साखरेचे आळे या ओवीत जसं पेरावं तसं उगवतं, असा संदेश दिला आहे. त्याचबरोह लिंबाच्या झाडांना साखरेचं आळं घातलं, तरी त्याचा कडूपणाचा गुणधर्म लिंब सोडत नाही, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचंही लिंबाच्या झाडासारखंच आहे. त्यानं दहशतवादाचं बीज वाढवलं, त्याला खतपाणी घातलं. दहशतवाद्यांत चांगले आणि वाईट असा भेद केला. परदेशाविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना मदत, त्यांची पाठराखण आणि देशात धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई हे पाकिस्तानी तंत्र त्याच्याच अंगलट आलं आहे. विषारी साप पाळता येत नाहीत, तसंच दहशतवाद्यांचंही असतं. त्यांना पोसलं, तर ते पोसणाऱ्यांवर कधी उलटतील, हे सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये वारंवार दहशतवादी हल्ले व्हायला लागले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांना मदत केली, अफगाणिस्तानला मदत केली, तेच आता अंगलट यायला लागलं आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावरमधील मशिदीत सोमवारी आत्मघातकी हल्ला झाला. हा हल्ला इतका भीषण होता, की मशिदीचा काही भागही कोसळला. या हल्ल्यात शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला. अडीचशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अल्लाच्या दरबारीही कुणी सुरक्षित नाही, याची प्रचिती तिथं आली. या हल्ल्यानंतर ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चा कमांडर सरबफाक मोहम्मद यानं ट्वीट करून जबाबदारी स्वीकारली; मात्र काही वेळानंतर तालिबाननं हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार देत धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याचं आमचं धोरण नसल्याचं सांगितलं; पण तालिबाननं आपल्या कमांडरनं याची जबाबदारी का घेतली हे सांगितलं नाही. ‘इस्लाम’च्या नावानं बांधलेल्या पाकिस्तानात तालिबान धार्मिक उन्मादासाठी हल्ले का करत आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. २००७ मध्ये अमेरिकेच्या आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर अनेक दहशतवादी गटांनी एकत्र येऊन ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ची स्थापना केली. त्याला पाक तालिबान असंही म्हणतात. या संघटनेला अफगाण तालिबाननं नेहमीच पाठिंबा दिला आहे. पाक तालिबाननं पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या आपल्या दहशतवाद्यांना सोडावं, अशी मागणी केली आहे. देशात कठोर इस्लामी कायदे लागू केले पाहिजेत. याशिवाय अमेरिकेसारख्या देशाशी दहशतवादाविरुद्धचं सहकार्य संपवलं पाहिजे. याशिवाय खैबर पख्तूनख्वामधील पाकिस्तानी सैन्य कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या भागातील पख्तून लोक दीर्घकाळापासून स्वायत्ततेची मागणी करत आहेत. पश्तूनांच्या विविध जमातीही तालिबानला पाठिंबा देत आहेत.
विशेषत: या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान सरकारसोबतची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर तालिबाननं हल्ल्यांचा वेग वाढवला आहे. त्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांना तालिबानविरोधातील कारवाईत सहभागी न होण्याचा इशारा दिला. त्यानंतरही मोहीम सुरू ठेवल्यानं तालिबाननं हा हल्ला केल्याचं मानलं जात आहे. सोमवारच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश पोलिस कर्मचारी आहेत. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही एक वेगळी दहशतवादी संघटना आहे; परंतु ती नेहमीच अफगाण तालिबानशी समन्वय साधत आली आहे. ‘टीटीपी’चे बहुतांश दहशतवादी खैबरमध्ये राहतात; पण त्यांना अफगाणिस्तानातही आश्रय मिळाला आहे. तालिबाननं नेहमीच सांगितलं आहे, की ते कोणालाही दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करू देणार नाहीत, तरीही त्याचा ’तेहरीक-ए-तालिबान’शी संबंध असून त्याचे दहशतवादी अफगाणिस्तानातून सक्रिय झाले आहेत. असं म्हणता येईल की, पाकिस्तानचा धार्मिक उन्माद फोफावत आहे आणि त्यानं तालिबानच्या रूपात एक ज्ञात शत्रू तयार केला आहे. यामुळं दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. पेशावरच्या पोलिस लाईन परिसरात असलेल्या मशिदीमध्ये लोक नमाज अदा करत असताना हा स्फोट झाला, यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो. सध्या या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही; मात्र प्राथमिक अंदाजानुसार हा स्फोट आत्मघातकी पथकाच्या सदस्यामार्फत करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मशिदीत बॉम्ब पेरण्यात आला असावा, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. घटनेचं स्वरूप आणि त्यात सहभागी लोकांची जबाबदारी सर्वसमावेशक तपासानंतर ठरवली जाईल; परंतु हे निश्चित आहे की, पाकिस्तानातील सामान्य लोकही इतर देशांच्या लोकांइतकेच जागतिक दहशतवादाचं लक्ष्य आहेत. गंमत अशी आहे की, प्रत्येक वेळी अशा हल्ल्यांचा फटका जगभरातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतो, तर त्याचे आश्रयदाते पडद्याआड बसून कट रचत असतात. वास्तविक, ही पाकिस्तानातील दहशतवादाची एक वेगळी घटना नाही. तिथंही दररोज दहशतवादी हल्ले होत असतात आणि त्यात सामान्य लोक बळी पडतात; पण दहशतवादाची आग हळूहळू पाकिस्तानलाही कशी उद्ध्वस्त करत आहे, हे मान्य करण्याची तिथल्या सत्ताधारी शक्तींना कदाचित गरज वाटत नाही. याआधी गेल्या वर्षी ४ मार्च रोजी पेशावरमधील कोचा रिसालदार भागातील शिया मशिदीत आत्मघाती बॉम्बस्फोटात ६३ लोक ठार झाले होते, तर दोनशे जण जखमी झाले होते. त्या घटनेची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी गटाच्या खोरासान युनिटनं स्वीकारली. यावरून अंदाज बांधता येतो की, गेल्या अडीच वर्षांच्या आकडेवारीनुसार तिथं दहशतवादी हल्ल्यात सुमारे साडेसातशे जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
भारतानं अनेकदा दहशतवादी घटनांसाठी पाकिस्तानातील तळांवरून काम करणाऱ्या संघटनांना जबाबदार धरलं आहे, हे लपून राहिलेलं नाही. अनेक वेळा आंतरराष्ट्रीय मंचांवरही पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना शह देऊ नका, असा इशारा देण्यात आला आहे; पण खेदाची गोष्ट ही आहे, की जेव्हा-जेव्हा असा आवाज उठवला जातो, तेव्हा पाकिस्तान तो खोटा आरोप म्हणून फेटाळून लावतो किंवा त्याकडं दुर्लक्ष करतो. दहशतवादाला संरक्षण देण्याच्या प्रश्नावर पाकिस्तानला आर्थिक आणि राजकीय पातळीवर मोठा फटका सहन करावा लागत आहे. अलीकडंच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं पाकिस्तानमधील अब्दुल रहमान मक्की या दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी म्हणून यादीत टाकलं आहे. २०१४ मध्ये पेशावरमधील ‘आर्मी स्कूल’वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं जग हादरलं होतं. त्या हल्ल्यात लहान मुलांसह दीडशे जणांना जीव गमवावा लागला होता. मशिदीवर झालेल्या हल्ल्यानंतर मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुरासानीच्या भावानं असा दावा केला आहे, की हा आत्मघाती हल्ला गेल्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या त्याच्या भावाचा बदला म्हणून केलेला हल्ला होता.
भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com