बजेट सादर झाले! अन् मुकेश अंबानींना तब्बल 9,206 कोटींचा फटका! वाचा नेमके कारण...
मंगळवारी (ता.२४) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. सरकारकडून विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. अशातच तिकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना मात्र तब्बल 9,206 कोटींचा फटका बसला आहे. आता तुम्ही विचारात पडला असाल असे नेमके काय झाले की अंबानी यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर रिलायन्सच्या शेअर घसरणीमुळे त्यांना फटका बसला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण
देशातील सर्वाधिक व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने, चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 1.1 अब्ज डॉलरची अर्थात 9,206 कोटींनी घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती आता 112 अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे.
हेही वाचा : ईशा अंबानींचे वडिलांच्या पाऊलावर पाऊल; देशातील 180 शहरांत उघडणार..!
अलीकडेच वाढली होती संपत्ती
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी मागील आठवड्यात आपल्या धाकट्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात केले होते. ज्यामध्ये झालेल्या खर्चाची खूप चर्चा देखील झाली होती. इतकेच नाही तर रिजार्चवाढीनंतर १० दिवसांत त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली होती. ज्यामुळे नुकतीच जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांनी ११ व्या स्थानी झेप घेतली होती. मात्र, आता अर्थसंकल्प सादर होताच रिलायन्सच्या शेअरने गटांगळी खाल्ल्याने मुकेश अंबानी यांना 9,206 कोटींचा फटका बसला आहे.
अर्थसंकल्पाच्या दिवशी अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ
याउलट देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 75.1 कोटी डॉलरने वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर करतेवेळी इकडे अदानी समूहाच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. दरम्यान, गौतम अदानी हे 102 अब्ज डॉलरच्या वाढीसह जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानावर आहे.