अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात नेमकं काय घडतंय? वाचा... कशी असेल आज बाजाराची चाल!
आज अर्थात अर्थसंकलपाच्या दिवशी शेअर बाजार उघडताच बजेट घोषणेच्या आधी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समध्ये 200 पेक्षा जास्त अंकांची तेजी दिसून आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 60 अंकांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. तर अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच सोमवारी शेअर बाजारात 100 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली होती.
बाजार पुन्हा उतरणीला
दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगदी काही वेळ आधी शेअर बाजाराने घसरण नोंदवली आहे. सकाळी ११ वाजता मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समध्ये १२२.१४ अंकांनी घसरण होत, तो ८०,३७९.९४. अंकापर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये देखील सकाळी १० ते ११ या कालावधीत 43 अंकांची घसरण झाली. मात्र, सकाळी ११ वाजता निफ्टीने पुन्हा सावरत १०.३५ अंकांची उसळी घेत २४,५१९.६० अंकांवर झेप घेतली आहे.
Union Budget 2024: अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना काय मिळणार?
भाषण सुरु होताच बाजार पुन्हा तेजीत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरु होताच शेअर बाजारात पुन्हा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्सने 180 अंकांची उसळी घेत 80682 चा स्तर गाठला. तर निफ्टी देखील 37 अंकांच्या वाढीसह 24546 च्या पातळीवर पाहायला मिळाला. आज वाढणाऱ्या निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये अदानी पोर्ट 1.80 टक्क्यांनी वाढून, 1493.70 रुपयांवर पोहोचला. तर आयटीसीचा शेअर देखील 1.37 टक्क्यांनी वधारला. याशिवाय L&T चा शेअर 1.35 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर 1.17 आणि टाटा कंझ्युमरचा शेअर 1.14 टक्क्यांनी तेजीत पाहायला मिळाला.