'टाटा'ची वाहने खरेदी करणे झाले सोपे, बजाज फायनान्सकडून तात्काळ मिळणार अर्थसहाय्य!
देशभरातील वाहन खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने, देशातील प्रमुख वित्तीय सेवा पुरवणाऱ्या समूहांपैकी एक असलेल्या बजाज फायनान्ससोबत करार केला आहे. प्रामुख्याने औद्योगिक वाहनांच्या खरेदीदारांना झटपट कर्जासाठी टाटा मोटर्सकडून बजाज फायनान्स सोबत हा करार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता जे लोक टाटा मोटर्सच्या बस, ट्रक, मिनी ट्रॅक आणि पिकअपसह अन्य वाहनांच्या खरेदीचा विचार करत आहे. त्यांना या करारामुळे मोठा फायदा होणार आहे.
देशभरातील उद्योजकांना फायदा होणार
या कराराबाबत बोलताना टाटा मोटर्सचे बिझनेस हेड राजेश कौल यांनी सांगितले आहे की, टाटा मोटर्स कंपनी बजाज फायनान्ससोबत करार करत खूप आनंदित आहे. कंपनीच्या ग्राहकांना त्यांचे आर्थिक समस्येचे निदान वाहन खरेदीदरम्यानच होणार आहे. ज्यामुळे त्यांच्या वाहन खरेदीतील अडचणी तात्काळ दूर होणार आहे. अर्थात कंपनीच्या वाणिज्यिक वाहनांच्या खरेदीदरम्यान ग्राहकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या करारामुळे देशभरातील उद्योजकांना फायदा होणार आहे.
ग्राहकांना आर्थिक मदतीचा हात देणे हाच उद्देश
तर कराराबाबत बोलताना बजाज फायनान्स कंपनीचे उप-व्यवस्थापकीय संचालक अनुप साहा यांनी म्हटले आहे की, ”बजाज फायनान्सकडून आपल्या ग्राहकांना सर्वोच्च प्राथमिकता दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना समाधानकारक अर्थसहाय्य करत, त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगतीपथावर नेण्यासाठी मदतगार ठरते. टाटा मोटर्ससोबत झालेला हा सामंजस्य करार हा ग्राहकांना आर्थिक मदतीचा हात देणे, याच उद्देशाने करण्यात आलेला आहे. बजाज फायनान्स कंपनीला आशा आहे की, यामुळे अधिकाधिक वाणिज्यिक वाहन खरेदीदारांना यामुळे फायदा होईल.”
टाटा मोटर्स प्रामुख्याने 1 टन ते 55 टन क्षमतेची मालवाहू वाहने आणि 10 सीटर ते 51 सीटर अशी प्रवाशी वाहने निर्मिती करते. यामध्ये लहान व्यावसायिक वाहने आणि पिकअप, ट्रक आणि बसचा देखील समावेश आहे. तर बजाज फायनान्स ही भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण एनबीएफसीपैकी एक आहे. कंपनी 83.64 दशलक्षाहून अधिक ग्राहकांना कर्ज, ठेव आणि पेमेंट सेवा प्रदान करते. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 3,30,615 कोटी रुपये इतकी होती.