फोटो सौजन्य- iStock
भारतामधील विमानतळांचे जाळ दिवसेंदिवस विस्तारत आहे. देशातील दळणवळणाच्या साधनांमध्ये सर्वसामान्यांसाठी विमाने ही महत्वाची ठरत आहेत. म्हणूनच आज टू आणि थ्री टायर शहरांमध्येही विमानतळे आहेत अथवा उभी केली जात आहेत. हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने सरकारनेही मोठी पाऊले टाकली आहेत. आज भारतात एक अस विमानतळ आहे जे तब्बल 150 डेस्टिनेशनशी जोडले गेले आहे. यावरुनच या विमानतळाचे महत्व कळू शकेल. जाणून घेऊया या विमानतळाबद्दल
150 शहरांना जोडणारे भारतातील विमानतळ ठरले आहे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे इतक्या डेस्टिनेशनला जोडणारे एकमेव विमानतळ ठरले आहे. बँकॉकचे-डॉन मुआंग विमानतळ हे दिल्ली विमानतळाशी जोडले गेलेले 150 वे विमानतळ आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, हा नवीन मार्ग आठवड्यातून दोनदा एअरबस ए330 विमानाने चालवला जाईल. जानेवारी 2025 च्या मध्यापर्यंत एअरलाइनची वारंवारता दोन ते चार पट वाढवण्याची योजना आहे.
20 हून अधिक आतंरराष्ट्रीय विमानतळे आली जोडण्यात
रिपोर्ट्नुसार, दिल्ली विमानतळाचे संचालन करणारी कंपनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत दिल्ली विमानतळद्वारे 20 हून जास्त आंतरराष्ट्रीय डेस्टीनेशन जोडली गेली आहेत. ज्यामध्ये नोम पेन्ह, कॅलगरी, बाली डेनपसार, मॉन्ट्रियल, व्हँकुव्हर, वॉशिंग्टन ड्युलेस, शिकागो ओहारे आणि टोकियो हानेडा आदींचा समावेश आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये, विमानतळाने ट्रान्सफर प्रवाशांमध्ये 100 टक्के वाढ अनुभवली आहे, त्यामुळे दक्षिण आशियातील अग्रगण्य ट्रान्झिट हब म्हणून इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळाचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
देशातील 88 टक्के ठिकाणे दिल्लीशी जोडली गेली आहेत
भारतातील सर्व लांब पल्ल्याच्या डेस्टिनेशनच्या 88 टक्के स्थाने ही दिल्लीशी जोडली गेली आहेत आणि भारतातील सर्व लांब पल्ल्याच्या साप्ताहिक उड्डाणांपैकी तब्बल 56 टक्के उड्डाणे दिल्ली विमानतळावरून होतात. भारतातील जवळपास 50 टक्के (42 टक्के अचूक) लांब पल्ल्याचे प्रवासी दिल्लीला प्रवेशद्वार म्हणून निवडतात. दिल्ली विमानतळ हे दरवर्षी 40 लाख देशांतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनशी कनेक्ट करते.
जगभरातील प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्यासाठी समर्पित
भारतीय एअरलाइन कंपन्यांकडून दिल्ली विमानतळाला सुपर-कनेक्टर हबमध्ये रूपांतरित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अग्रगण्य पर्याय म्हणून त्याचे स्थान भक्कम करण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे सीईओ विदेह कुमार जयपूरियार यांनी सांगितले की, 150 गंतव्यस्थानांना जोडण्याचा हा टप्पा म्हणजे जागतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देण्याच्या आमच्या अटूट बांधिलकीचा महत्वाचा पुरावा आहे. भारताला विमान वाहतुकीच्या एका नव्या युगात नेण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि जगभरातील प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.