बिटकॉइन घोटाळा प्रकरणी गौरव मेहतांच्या घरावर ईडीचा छापा; सुप्रिया सुळेंसह नाना पटोलेंची चौकशी होणार?
महाराष्ट्रातील क्रिप्टो करन्सी बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या टीमने गौरव मेहतांच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीची टीम गौरव मेहता यांच्या रायपूर येथील निवासस्थानी पोहोचली आहे. क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात गौरव मेहता हे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या संपर्कात होते, अशीही माहिती आहे.
निवडणुकीदरम्यान बिटकॉईनच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीची विक्री करण्यात आली होती. तो रोखीचा खेळ आहे. दरम्यान, या घटनेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या सहभागाची चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये नेमके काय म्हटलंय?
235 कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी गौरव मेहता यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. या क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या सहभागाची चौकशी आवश्यक असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोख रकमेसाठी बिटकॉईनची देवाणघेवाण झाल्याचे सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
बिटकॉइन घोटाळा समोर आला आहे. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले होते.
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिपही समोर आली होती. आता या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या गौरव मेहताचा उल्लेख झाला. त्याच्या रायपुर मधील घरी ईडीने धाड टाकली आहे. 2018 साली झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले.
6600 कोटींचा आहे हा घोटाळा
माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांनी 2018 च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात गौरव मेहता हा प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. गौरव मेहता हा एका ऑडिट फर्मचा कन्सलटन्ट असून पुणे पोलीस 6600 कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. रविंद्र पाटील यांनी दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव मेहताला फोन करून क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील रक्कम निवडणुकीच्या कामासाठी मागितली होती.