शेतकरी आंदोलन, हमीभावाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक; सरकारला धरले धारेवर!
सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु असून, आज संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यात शेतकरी आंदोलन आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलन आणि पिकांच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. तर त्यास प्रतिउत्तर करताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तिखट प्रतिक्रिया देत बीजेपी सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमीभाव देत आहे. मात्र, असे असूनही विरोधी पक्षातील नेते अपप्रचार करत आहे. असे म्हटले. ज्यामुळे संसदेचे वातावरण काही काळ चांगलेच तापले होते.
राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे
काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज शेतकऱ्यांच्या मुद्दयावरून लोकसभेत चांगलाच आक्रमक पवित्रा घेत भाजप सरकारला धारेवर धरले. यामध्ये प्रामुख्याने फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र, अजूनही सरकारला शेतकर्यांकडे पाहायला वेळ नाही. याउलट दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्ग आजही बंद आहेत. याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना आतंकवादी अशी उपाधी दिल्याचा देखील राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला.
इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, “देशातील उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जाते. मात्र, देशभरातील जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही.” विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य दर मिळाला तर त्यांना कर्ज घेण्याची आणि सरकारी योजनांची गरजच पडणार नाही. असेही राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतील एका शेतकऱ्याचे वाक्य लोकसभेत नमूद करताना सांगितले. मात्र, असे असताना
कृषिमंत्र्यांची तिखट प्रतिक्रिया
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यांना प्रतिउत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत म्हटले आहे की, विरोधी पक्ष संसदेत चुकीची माहिती मांडत आहे. एनडीए सरकार देशातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देत आहे. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या उत्पादनाला खर्चावर ५० टक्के अधिक रकमेचा हमीभाव दिला जात आहे. सरकारने नुकतेच १४ पिकांचे हमीभाव वाढवले आहेत. मात्र, असे असूनही विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.