व्यवसायाने फॅशन डिझायनर, शेतीकडे वळला; आंबा शेतीतून करतोय वार्षिक ४० लाखांची कमाई!
सध्याच्या घडीला अनेक जण नोकरी सोडून शेतीकडे ओढले जात आहे. यातील अनेक जण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. ज्यामुळे त्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका प्रगतिशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे आपल्या २५ एकरातील आंबा शेतीतून वार्षिक ४० ते ५० लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवत आहे.
व्यवसायासह शेतीतही यश
मोहम्मद फहद फारूकी असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील सीतापुर जिल्ह्यातील खैराबाद येथील रहिवाशी आहे. विशेष म्हणजे शेतकरी मोहम्मद फहद फारूकी हे व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. आपल्या व्यवसायासह त्यांनी शेतीमध्ये पाऊल ठेवले आणि त्यात त्यांना यश देखील मिळाले आहे. मोहम्मद फहद फारूकी यांची आंबा शेती ही वडिलोपार्जित असून, त्यांनी वडिलांसोबतच आपला व्यवसाय सांभाळताना शेतीवर लक्ष केंद्रित करणे सुरु केले आहे.
२०० प्रजातींच्या आंब्याची लागवड
शेतकरी मोहम्मद फहद फारूकी सांगतात, आपण कोरोना काळानंतर शेतीमध्ये लक्ष देणे सुरु केले. आपल्या वाडवडिलांनी जवळपास 128 वर्षांपासून आंबा शेती जपली आहे. यात आपल्या आजोबांनी आंबा शेती वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. याशिवाय पणजोबा मौलवी हजूर अहमद यांनी देखील आंब्याची विविध प्रजातींची लागवड केली होती. त्यानंतर आता आपण सध्या जवळपास आंबा शेतीमध्ये एकूण २०० प्रजातींच्या माध्यमातून आंबा शेती करत आहोत. यामध्ये आपल्याकडे प्रामुख्याने बॉम्बे, दशहरी आंबा, लंगडा, खजरी आणि चौसा या आंब्याचे उत्पादन घेतो.
किती मिळतोय दर?
शेतकरी मोहम्मद फहद फारूकी सांगतात, आपल्या बागेत उत्पादित होणारा सर्वात स्वस्त आंबा हा 150 रुपये प्रति किलो दराने विकला जातो. तर सर्वात महाग आंबा हा 500 रुपये प्रति किलो दराने विकला जातो. आपण आंबा उत्पादन घेताना प्रामुख्याने रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन्ही पद्धतीचा वापर करून उत्पादन घेतो. ज्यामुळे आपल्याला ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेण्यास मदत होते.
किती मिळतंय उत्पन्न?
शेतकरी मोहम्मद फहद फारूकी सांगतात, “यावर्षी हवामान चांगले राहिल्याने आपल्याला आंबा शेतीतून चांगले उत्पादन मिळाले आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा २५ एकरात उच्चांकी 40 ते 50 लाख रुपये उत्पादन मिळाले आहे. आपला शेतातील सर्व आंबा आपण दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, भोपाळसह अनेक मेट्रो शहरांमध्ये पाठवतो. इतकेच नाही तर काही स्थानिक बाजार समित्यांमध्ये देखील आंबा विक्रीला पाठवतो.” दरम्यान, शेतकरी मोहम्मद फहद फारूकी यांची नियोजनपूर्वक आंबा शेतीची ही यशोगाथा आसपासच्या अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.