राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात 'यलो अलर्ट'ही जारी (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दुपारी कडक उन्ह तर रात्री हवेत गारवा दिसून येत आहे. असे असताना आता हवामान विभागाने ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ विभागात विजांसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार, आता या भागांत ‘यलो अलर्ट’ही जारी केला गेला आहे.
परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पिकांचे देखील नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. काही भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दिवसा तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर रात्री तापमानात काहीशी घट होईल.
मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार
मराठवाड्यातही वातावरणात बदल दिसून येऊ शकतो. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यात तापमानातही काही बदल दिसून येणार आहे. त्यानुसार, कमाल तापमान 33 ते 35°C दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 20 ते 22°C च्या आसपास राहील. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत दुपारचे तापमान किंचित कमी जाणवू शकते.
चंद्रपूर, गडचिरोलीत पावसाचा इशारा
विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते आणि काही भागांत विजांच्या कडकडाटासह सरी पडण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…






