India FDI Slowdown: एफडीआयची दिशा बदलतेय? भारतात निव्वळ परकीय गुंतवणूक ४४ अब्जांवरून थेट १ अब्जांवर
India FDI Slowdown: २०२० ते २०२५ या आर्थिक वर्षांमध्ये, भारतात एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ ७० ते ८५ अब्ज डॉलर्सच्या श्रेणीत राहिला, परंतु या काळात वाढ जवळजवळ स्थिर राहिली. केअर एज रेटिंग्जच्या आकडेवारीनुसार, या काळात एकूण थेट परकीय गुंतवणूकीचा सरासरी वार्षिक विकास दर सुमारे २ टक्के होता. तथापि, अधिक चिंताजनक बाब म्हणजे याच काळात भारतात निव्वळ थेट परकीय गुंतवणूकीत मोठी घट झाली आहे. केअरएजच्या मते, २०२० या आर्थिक वर्षात निव्वळ एफडीआयचा प्रवाह ४४ अब्ज डॉलर्स होता, जो २०२५ या आर्थिक वर्षांत फक्त १ अब्ज डॉलर्सवर घसरला. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, सकल एफडीआयमध्ये सुधारणा दिसून आली असली तरी, परदेशी गुंतवणूकदारांकडून नफा वसुली झाल्यामुळे आणि भारतातून बाहेर पडणाऱ्या FDI च्या प्रवाहात वाढ झाल्यामुळे निव्वळ FDI वर मोठा दबाव आला आहे.
अहवालानुसार, २०२३ आणि २०२४ या आर्थिक वर्षात सकल एफडीआय सुमारे ७१ अब्ज डॉलर्सवर स्थिर राहिला, जो २०२५ या आर्थिक वर्षात १३ टक्क्यांनी वाडून ८१ अब्ज डॉलर्स झाला. तरीही, नफा परत पाठवल्यामुळे आणि बाह्य एफडीआयमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे २०२४ या आर्थिक वर्षात निव्वळ एफडीआय १० अब्ज डॉलर्सवर घसरला आणि २०२५ या आर्थिक वर्षांत फक्त १ अब्ज डॉलर्सवर आला. तथापि, केअरएजने असेही अधोरेखित केले की भारतातील आवक एफडीआयवरील सरासरी परतावा ७.३ टक्के आहे, जो अनेक उदयोन्मुख आणि विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा चांगला आहे. अहवालानुसार, परदेशी कंपनीचे पुनर्गुतवणूक किंवा नफ्याचे परतावा हे त्याच्या धोरणात्मक प्राधान्यक्रम आणि भांडवली वाटप धोरणाचे प्रतिबिंब आहे.
हेही वाचा: India 5G Network: डिजिटल भारताची झेप! 5G वापरात भारत जगात ‘या’ क्रमांकावर
जागतिक थेट गुंतवणुकीच्या परिदृश्याकडे पाहता, अहवालात असे नमूद केले आहे की अलिकडच्या वर्षांत जागतिक थेट गुंतवणुकीचा प्रवाह कमकुवत आहे आणि जीडीपी वाढीपेक्षा मागे आहे. जागतिक थेट परकीय गुंतवणूक आणि जीडीपी प्रमाण २०२१ मध्ये २.४ टक्क्यांच्या शिखरावरून २०२४ मध्ये १.३ टक्क्यापर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापासून ही घसरण सुरूच आहे, जेव्हा ती २००७ मध्ये ५.३ टक्क्यांवर पोहोचली होती. अहवालात युरोपमधून थेट परकीय गुंतवणूकीत घट आणि अमेरिकेतून येणाऱ्या प्रवाहात स्थिरता दर्शविली आहे.
याउलट, जागतिक थेट परकीय गुंतवणूकीत चीनचा वाटा लक्षणीयरीत्या वाढला आहे, २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात तो कमी होता, जो महामारीनंतरच्या काळात सरासरी ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. व्हिएतनाम, मेक्सिको आणि संसाधनांनी समृद्ध आफ्रिकन देशांसारख्या चीन धोरणाचा फायदा घेणाऱ्या देशांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीत मोठी वाढ झाली आहे. त्याच वेळी, जागतिक बेट परकीय गुंतवणूकीत भारताचा वाटा २.९ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, ज्याचे मुख्य कारण नफ्याचे वाढलेले परतावा असल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर पुन्हा वाढले, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, सेवा क्षेत्र हे सर्वात मोठे घेट गुंतवणुकीचे क्षेत्र होते, जे एकूण गुंतवणूकीच्या १९ टक्के होते. त्यानंतर संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्र होते. ज्याला १६ टक्के थेट गुंतवणुकीचे क्षेत्र मिळाले. व्यापार आणि अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रांना प्रत्येकी ८ टक्के मिळाले. या काळात, व्यापार, अपारंपारिक ऊर्जा, ऑटोमोबाईल्स आणि रसायनामध्ये (खते वगळून) एफडीआय वाढला, तर औषधनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाली. अहवालात असेही म्हटले आहे की, सेमीकंडक्टर, इलेट्रिक वाहने, बॅटरी स्टोरेज आणि डेटा सेंटर्स यांसारखे उदयोन्मुख क्षेत्र परदेशी गुतवणूकदारांसाठी अधिकाधिक आकर्षक होत आहेत.






