फोटो सौजन्य - Social Media
मुंबई : ७ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या वर्ल्ड चॉकलेट डे निमित्त इन्स्टामार्टने जाहीर केलेल्या आकडेवारीत भारतातील बदलत्या चॉकलेटप्रेमाचे रोचक चित्र समोर आले आहे. व्हायरल इंटरनेट ट्रेंड्स, प्रीमियम चॉकलेट्स आणि आरोग्यदायी पर्यायांमुळे भारतीय ग्राहकांच्या चवीत मोठा बदल होत असल्याचे या अहवालातून दिसून आले. एकेकाळी सण-उत्सवांपुरते मर्यादित असलेले चॉकलेट आता दैनंदिन किराणा खरेदीचा महत्त्वाचा भाग बनले आहे.
इन्स्टामार्टच्या माहितीनुसार, व्हायरल दुबई पिस्ता चॉकलेटच्या ऑर्डर्समध्ये तब्बल ११,७३९ टक्क्यांची वाढ झाली असून हा सर्वाधिक वेगाने वाढणारा चॉकलेट ट्रेंड ठरला आहे. तरीही भारतीयांची पहिली पसंती पारंपरिक मिल्क चॉकलेटलाच आहे. प्रत्येक दहा चॉकलेट ऑर्डर्सपैकी चार ऑर्डर्स मिल्क चॉकलेटच्या असून, वेफर बार्स, फ्रूट अँड नट, कॅरमेल आणि हेजलनट फ्लेवर्सनाही मोठी पसंती मिळत आहे.
आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचा परिणामही चॉकलेट खरेदीत दिसून आला आहे. शुगर-फ्री चॉकलेट्सच्या ऑर्डर्समध्ये ८५ टक्के, तर डार्क चॉकलेट्समध्ये जवळपास ५० टक्के वाढ झाली आहे. प्रोटीन चॉकलेट्सचाही वेगाने विस्तार होत असून, चव आणि आरोग्याचा समतोल साधणाऱ्या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहरांनुसार पाहता, बंगळुरू हे भारताचे ‘चॉकलेट कॅपिटल’ ठरले असून तेथे इतर महानगरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट चॉकलेट ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या. शुगर-फ्री आणि प्रोटीन चॉकलेट्सच्या जवळपास २५ टक्के ऑर्डर्स एकट्या बंगळुरूतून आल्या. मुंबई प्रीमियम चॉकलेट्सच्या खरेदीत देशात अव्वल ठरली, तर सुरत, वडोदरा, कोल्हापूर आणि सिलिगुडीसारखी शहरेही प्रीमियम चॉकलेट्सची नवी केंद्रे म्हणून पुढे येत आहेत.
चॉकलेटप्रेमींच्या खरेदीतही काही मनोरंजक आकडे समोर आले. अहमदाबादमधील एका ग्राहकाने वर्षभरात १.५९ लाख रुपयांची चॉकलेट्स खरेदी केली, तर कोचीतील एका ग्राहकाने वर्षभरात तब्बल २७७ चॉकलेट ऑर्डर्स दिल्या. यावरून भारतातील चॉकलेटप्रेम अधिक वैविध्यपूर्ण आणि वाढत्या प्रमाणात दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हॅलेंटाईन डेलाही चॉकलेट्सची मोठी क्रेझ पाहायला मिळाली. १४ फेब्रुवारी रोजी चॉकलेट ऑर्डर्समध्ये ७४ टक्क्यांची वाढ झाली आणि सकाळी ११.२५ वाजता एका मिनिटात तब्बल ७४५ चॉकलेट्सची ऑर्डर नोंदवली गेली. पॉपकॉर्न, आइस्क्रीम आणि सॉफ्ट ड्रिंक्ससोबतच आता ग्राहक इन्स्टंट नूडल्स, केळी, प्रोटीन शेक्स आणि इतर दैनंदिन वस्तूंसोबतही चॉकलेट्सची खरेदी करत असल्याने चॉकलेट हे केवळ सण-समारंभापुरते न राहता रोजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनल्याचे इन्स्टामार्टच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.






