फोटो सौजन्य: Social Media
भारतातातील कामगार मंडळी मोठ्या उत्साहात कोणत्या सणाची वाट पाहत असेल तर तो सण म्हणजे दिवाळी. हा सण खास असण्याचं कारण म्हणजे या काळात मिळणारा बोनस आणि गिफ्ट. पण गुजरातमधील एका कंपनीने चक्क दिवाळीच्या बोनसलाही लाजवेल अशी दमदार भेट आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे.
प्रत्येक कंपनी जेव्हा एखादा नवीन टप्पा गाठते, तेव्हा ती आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा यानिमित्ताने भेटवस्तू देत असते. नुकतेच, गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील एका ज्वेलर्स कंपनीने 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क एसयूव्ही कार गिफ्ट केल्या आहेत. चला या कंपनीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
19 वर्षांपूर्वी दोन भावांनी ज्वेलर्सच्या बिजनेसमध्ये आपले पाऊल ठेवले होते. केके ज्वेलर्स असे या कंपनीचे नाव आहे. आज कंपनीने 200 कोटी टर्नओव्हरचा टप्पा पार केला आहे.
काबरा ज्वेलर्सने आपल्या यशाचा मोठा टप्पा गाठत 200 कोटींच्या टर्नओव्हरचा टप्पा साध्य केला आहे. कंपनीने जेव्हा पहिले शोरूम सुरू केले, तेव्हा त्यांच्यासोबत अवघ्या 12 कर्मचारी कार्यरत होते आणि पहिल्या वर्षात कंपनीचा टर्नओव्हर हा 2 कोटी रुपये होता. त्यावेळीच, दोघा भावंडांनी ठरवले होते की, जेव्हा कंपनी 200 कोटींच्या टप्प्यावर पोहोचेल, तेव्हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसोबत मोठे सेलिब्रेशन करू.
19 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर, कंपनीने 200 कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या माइलस्टोनची पूर्तता करत, काबरा ज्वेलर्सच्या संस्थापकांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत भव्य सेलिब्रेशन आयोजित केले.
कैलाश काबरा यांनी 2006 मध्ये केवळ 12 कर्मचाऱ्यांसह ज्वेलरी उद्योगात पाऊल ठेवले होते. आज, काबरा ज्वेलर्सच्या केके कंपनीत 140 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 200 कोटींच्या टर्नओव्हरचा विक्रमी टप्पा पार केला आहे. हे यश संपूर्ण टीमच्या परिश्रमामुळे शक्य झाले असल्याचे कैलाश काबरा यांनी नमूद केले. लक्झरी कार घेण्याऐवजी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत हा आनंद साजरा करण्याचे ठरवले आहे.
विशेष म्हणजे, सुरुवातीपासून कंपनीचा भाग असलेल्या वरिष्ठ आणि अनुभवी 12 कर्मचाऱ्यांना सन्मानित करत, त्यांना कार गिफ्ट करण्यात आल्या. या गिफ्ट्समध्ये महिंद्रा XUV 700, टोयोटा इनोव्हा, हुंडाई i10, हुंडाई एक्स्टर, मारुती सुजुकी एर्टिगा आणि मारुती सुजुकी ब्रेझा यांचा समावेश आहे.
दरम्यान, काबरा ज्वेलर्स ही आयपीओ लिस्टेड कंपनी असून मागील आर्थिक वर्षात कंपनीचा टर्नओव्हर 170 कोटी होता. यंदा 200 कोटींचा टप्पा पार करून कंपनीने आपली घोडदौड अधिक वेगवान सुरु ठेवली आहे.