Pahalgam Terror Attack: काश्मीर पर्यटन उद्योगाला मोठा फटका, 90 टक्के प्रवास बुकिंग रद्द (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Pahalgam Terror Attack Marathi News: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, दिल्लीतील अनेक ट्रॅव्हल एजन्सींनी बुधवारी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरसाठी केलेले जवळपास ९० टक्के बुकिंग रद्द केले आहेत.
कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलमधील शंकर मार्केट येथे असलेल्या स्वान ट्रॅव्हलर्सचे मालक गौरव राठी म्हणाले की, सुमारे २५ लोकांनी जम्मू आणि काश्मीरसाठी त्यांचे बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की बहुतेक पर्यटकांनी पुढील महिन्यात काश्मीरला भेट देण्याची योजना आखली होती पण आता ते रद्द करण्याची मागणी करत आहेत. दिल्लीतील ट्रॅव्हल एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरसाठी जवळपास ९० टक्के बुकिंग रद्द करण्यात आली आहेत, तर काही पर्यटक आता पर्यायी ठिकाणे शोधत आहेत.
कुशा ट्रॅव्हल्सचे मालक देव म्हणाले “आमच्याकडे काही कुटुंबांसाठी बुकिंग होते. बस आणि विमान तिकिटांपासून ते हॉटेलपर्यंत – सर्वकाही आगाऊ बुक केले होते. पण दहशतवादी हल्ल्याची बातमी कळताच, आम्हाला लगेचच रद्द करण्याचे फोन येऊ लागले,”.
गुलमर्ग, हजान व्हॅली आणि ट्यूलिप गार्डन सारखी लोकप्रिय पर्यटन स्थळे सर्वाधिक बुक झाली. गुड गाईड टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ट्रॅव्हल एजंट कार्तिक वर्मा म्हणाले, “या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात काश्मीरसाठी आमच्याकडे २० हून अधिक बुकिंग होते, परंतु जवळजवळ सर्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत.” ते पुढे म्हणाले, “लोक परतफेड मागत आहेत. ते म्हणतात की ते त्यांच्या प्रियजनांना अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाहीत जिथून परत येण्याची हमी नाही.”
कार्तिक वर्मा म्हणाले की, काही बुकिंग, विशेषतः फ्लाइट्स आणि हॉटेल्स, परत न करण्यायोग्य असल्याने, यामुळे ट्रॅव्हल एजन्सींसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वेळी कुटुंबांसाठी काश्मीर हे सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. आणखी एक ट्रॅव्हल एजन्सी ‘स्वस्तिक ट्रॅव्हल्स’ ने म्हटले आहे की काश्मीर हे केवळ दिल्लीकरांची पहिली पसंती नाही तर दिल्लीत येणाऱ्या आणि नंतर काश्मीरला भेट देण्याची योजना आखणाऱ्या पर्यटकांमध्येही त्याला मोठी मागणी आहे.
एजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स या दुसऱ्या एजन्सीने सांगितले की, श्रीनगर ट्रॅव्हल असोसिएशनकडून जम्मू आणि काश्मीरला जाणारी सर्व बुकिंग आणि वाहतूक थांबवण्याचे निर्देश मिळाले आहेत. “पुढील सूचना मिळेपर्यंत जम्मू आणि काश्मीरसाठी कोणतेही नवीन बुकिंग स्वीकारू नये असे आम्हाला निर्देश देण्यात आले आहेत,” असे एजन्सीने म्हटले आहे.
२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर पहलगाम हल्ला हा खोऱ्यातील सर्वात घातक हल्ला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन परदेशी आणि दोन स्थानिक रहिवासी आहेत, परंतु त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
ते असेही म्हणाले, “फक्त काश्मीरच नाही, तर आता लोक जम्मूला जाण्यासही घाबरतात. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कटरा येथे जाणाऱ्या सात कुटुंबांचे बुकिंग आमच्याकडे होते आणि तेही या भयानक हल्ल्यानंतर रद्द करण्यात आले आहे.”