फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या डिजिटल व्यवहार क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या फोनपेने आपल्या फिनटेक प्रवासाची १० वर्षे पूर्ण केल्याचा महत्त्वाचा टप्पा नुकताच साजरा केला. हा केवळ एका कंपनीचा प्रवास नसून, देशातील कोट्यवधी नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आणि व्यवहार सुलभतेचा प्रवास असल्याचे मानले जात आहे. गेल्या दशकभरात फोनपेने भारतात पैसे पाठवण्याची, स्वीकारण्याची आणि व्यवस्थापित करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे.
२०२५ मध्ये फोनपेने ६०० दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. यामुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील फोनपेची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. या कालावधीत कंपनीने वापरकर्त्यांचा विश्वास वाढवण्यावर आणि सुरक्षिततेवर विशेष भर दिला. UPI सर्कलसारखी नवी सुविधा सुरू करण्यात आली असून, यामुळे विश्वासार्ह संपर्कांना पेमेंटची जबाबदारी देणे शक्य झाले आहे. तसेच ‘फोनपे प्रोटेक्ट’ या अत्याधुनिक सुरक्षा फ्रेमवर्कमुळे लाखो वापरकर्त्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून संरक्षण मिळत आहे.
व्यापारी वर्गासाठीही फोनपेने मोठी पावले उचलली आहेत. ‘मेड-इन-इंडिया’ स्मार्ट स्पीकर आणि स्मार्ट POD या उपकरणांच्या माध्यमातून लहान-मोठ्या व्यवसायांना डिजिटल व्यवहार अधिक सुलभ करण्यात आले आहेत. SIDBI सोबत भागीदारीत सुरू करण्यात आलेल्या ‘उद्यम असिस्ट’ उपक्रमामुळे MSME उद्योगांना डिजिटल पद्धतीने औपचारिक क्रेडिट मिळवणे सोपे झाले आहे. या माध्यमातून फोनपे MSME साठी डिजिटल-फर्स्ट एकत्रीकरण देणारी देशातील पहिली संस्था ठरली आहे.
ग्राहकांसाठीही फोनपेने आपल्या सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. भारतातील ‘मिसिंग मिडल’ घटकासाठी परवडणारे होम इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय म्युच्युअल फंडांवर कर्ज, सिक्युअर्ड लेंडिंग यांसारख्या नाविन्यपूर्ण कर्ज सुविधांमुळे गरजूंना तत्काळ आर्थिक मदत मिळू लागली आहे.
या प्रवासाबाबत बोलताना फोनपेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम म्हणाले की, “१० वर्षांत मोठी प्रगती केली असली तरी आमचा प्रवास अजून शिखरावर पोहोचलेला नाही. हे शिखर किती उंच आहे, याची कल्पनाही आम्हाला नाही आणि हेच आम्हाला अधिक प्रेरणा देते.” तर संस्थापक व CTO राहुल चारी यांनी, “लोकांचा विश्वास संपादन करणारी उत्पादने निर्माण करणे हाच आमचा खरा धडा आहे. जिद्द आणि विश्वास यामुळेच एखादी कल्पना प्रभावी ठरते,” असे सांगितले.
स्थापनेपासूनच फोनपेने ‘इंडस्ट्री-फर्स्ट’ उपक्रमांद्वारे भारतीय फिनटेक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. डिजिटल गोल्ड, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, स्टॉक ब्रोकिंगपासून ते UPI Lite, क्रॉस-बॉर्डर UPI, इंडस ॲपस्टोअर, शेअर.मार्केट प्लॅटफॉर्मपर्यंत फोनपेने सेवा विस्तार केला आहे. २०२२ मध्ये मुख्यालय भारतात स्थलांतरित केल्यानंतर फोनपे भारताच्या आर्थिक रचनेचा अविभाज्य भाग बनले असून, प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक आर्थिक सेवा देण्याचा संकल्प कंपनीने अधिक बळकट केला आहे.






