शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर केले 109 वाण; उत्पन्न वाढण्यास होणार मदत!
हवामान बदलामुळे सध्या भारतीय शेतीला मोठा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशातील शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे १०९ नवीन वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व वाण उच्च उत्पन्न देणारी वाण असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) परिसरात नैसर्गिक शेतीसह सेंद्रिय अन्नाच्या वाढत्या गरजेवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच ६१ पिकांसाठी १०९ नवीन वाणांची शिफारस त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी केली आहे.
कोणत्या पिकांचे आहेत हे वाण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 61 पिकांच्या 109 वाणांमध्ये 34 शेती पिके आणि 27 बागायती पिके आहेत. शेती पिकांमध्ये बाजरी, चारा पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, फायबर आणि इतर पिकांसह तृणधान्य बियाण्यांचा देखील समावेश आहे. तर बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाजीपाला पिके, लावणी पिके, कंद पिके, मसाले, फुले व औषधी पिके यांचा समावेश आहे. या जातींमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणे शक्य होणार आहे.
(फोटो सौजन्य : एक्स हॅन्डल)
हेही वाचा : नोकरी सोडली, ड्रॅगन फळाच्या शेतीत रमला; कमावतोय वर्षाला 10 लाख रुपये!
हम अपने किसान भाई-बहनों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध हैं। इसी दिशा में आज दिल्ली में फसलों की 109 नई किस्मों को जारी करने का सुअवसर मिला। जलवायु अनुकूल और ज्यादा उपज देने वाली इन किस्मों से उत्पादन बढ़ने के साथ हमारे अन्नदाताओं की आय भी बढ़ेगी। pic.twitter.com/MqW7BP4M3a
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2024
आयसीएआरकडून 109 वाणांची बियाणेनिर्मिती
भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) सतत नवीन वाणांच्या बियाणेनिर्मितीमध्ये गुंतलेली असते. आज जाहीर करण्यात आलेल्या 109 वाणांचे बियाणे आयसीएआरकडून तयार करण्यात आले आहे. तृणधान्यांच्या २३ जाती, तांदळाच्या ९, गहू २, बार्ली १, मका ६, ज्वारी १, बाजरी १, नाचणी १, चिना १, सांबा १, तूर २, हरभरा २, मसूर ३, वाटाणा 1, मूग 2, एकूण 7 प्रकारचे तेलबिया. चाऱ्याच्या 7 जाती, उसाच्या 7 जाती, कापूस 5, ताग 1, बागायतीच्या पिकांच्या 40 जाती तयार करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधानांकडून केव्हीकेचे कौतुक
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या १०९ वाणाच्या जनजागृतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांनी (केव्हीके) घेतलेल्या कष्टाचेही कौतुक केले. तसेच केव्हीकेने त्यांच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दर महिन्याला विकसित केल्या जाणाऱ्या नवीन वाणांच्या फायद्यांविषयी शेतकऱ्यांना सक्रियपणे माहिती द्यावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली आहे. या नवीन पिकांच्या वाणांच्या विकासासाठी पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे कौतुकही केले. वापरात नसलेली पिके मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेनुसार ते काम करत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.