फोटो सौैजन्य - Social Media
चेन्नईच्या एका साध्याशा नवरा-बायकोच्या जोडीनं एक भन्नाट व्यवसाय सुरू केला, आणि आज ते कोट्यवधींचा टर्नओव्हर गाठत आहेत. या व्यवसायाचं नाव आहे ‘Sweet Karam Coffee’. नलिनी पार्थिबन आणि आनंद भारद्वाज या दोघांनी मिळून फक्त 2,000 रुपयांत हा व्यवसाय सुरू केला होता, घरच्या घरी पारंपरिक स्नॅक्स तयार करून.
एकदा पावसाळ्यात बाहेर काही चविष्ट खायला मिळत नव्हतं, आणि त्याच वेळी त्यांनी विचार केला की घरगुती चव असलेले, आजी-आजोबांच्या स्टाईलचे खायचे पदार्थ लोकांना हवे असतात. इथूनच या आयडियाचा जन्म झाला. मग काय 2015 मध्ये दिवाळीच्या आधी त्यांनी काही खास दक्षिण भारतीय स्नॅक्स बनवले जसं की मद्रास मिक्सचर, अथिरासम, स्वीट मुरुकू असे जवळपास 10 प्रकार.
सुरुवातीला ऑर्डर घेणं, डिलिव्हरी करणं, सगळं ते दोघंच करत होते. लोकांना पर्चे वाटून प्रचार करायचा, फोनवर ऑर्डर घ्यायच्या, अगदी झिरो बजेट मार्केटिंग! आणि तरीही लोकांनी छान प्रतिसाद दिला. नंतर त्यांनी हळूहळू आपल्या कुटुंबातल्या महिलांना कामात सहभागी केलं, आणि मग स्थानिक महिलांनाही काम दिलं, घरबसल्या कमावता यावं म्हणून. यामुळे एक वेगळीच कम्युनिटी तयार झाली.
2020 च्या लॉकडाऊनमध्ये तर त्यांच्या बिझनेसला जबरदस्त उधाण आलं, घरगुती खाण्याला मागणी वाढली होती ना! पण नंतर सगळं नॉर्मल झाल्यावर विक्री कमी झाली. मग त्यांनी आपला ब्रँड ऑनलाइन आणायचं ठरवलं. 2022 मध्ये वेबसाइट सुरू केली आणि भारताबाहेरही ऑर्डर्स मिळवायला सुरुवात केली. आज त्यांच्या वेबसाइटवर 60 हून अधिक प्रोडक्ट्स आहेत. 99 रुपयांपासून ते 899 रुपयांपर्यंतचे विविध स्नॅक्स. ‘Sweet Karam Coffee’ चे प्रॉडक्ट्स आज अमेरिका, मिडल ईस्ट, ब्रिटन अशा 30 हून अधिक देशांमध्ये पोहोचत आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 लाख ऑर्डर्स पार केल्या आहेत आणि 1 लाखांहून अधिक ग्राहक जोडले आहेत.
या सगळ्या प्रवासात नलिनी आणि आनंद दोघांनीही नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या व्यवसायात उतरले. अगदी साध्या स्वप्नातून सुरू झालेली ही गोष्ट आज एक मोठा ब्रँड बनली आहे आणि सगळ्यात खास म्हणजे, आपल्याच चवीनं जग जिंकलंय!