Share Market Today: नकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात, गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज ३ ऑक्टोबर रोजी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची मंद सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९४८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १९ अंकांनी कमी होता.
गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी दसरा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त भारतीय वित्तीय बाजार बंद होते. बुधवारी, रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण घोषणेनंतर, शेअर बाजाराने आठ दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला आणि शेअर बाजाराने तेजीचा अनुभव घेतला. सेन्सेक्स ७१५.६ ९ अंकांनी म्हणजेच ०.८९% ने वाढून ८०,९८३.३१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २२५.२० अंकांनी म्हणजेच ०.९२% ने २४,८३६.३० वर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक ७१२.१० अंकांनी किंवा १.३०% ने वाढून ५५,३४७.९५ वर बंद झाला. मात्र आज शेअर बाजारात नकारात्मक संकेत पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
फॅबटेक टेक्नॉलॉजीज आयपीओचे शेअर वाटप आज, शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी केले जाईल. हा इश्यू २९ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला होता आणि १ ऑक्टोबर रोजी बंद झाला. ६ ऑक्टोबर रोजी, कंपनी यशस्वी अर्जदारांच्या डीमॅट खात्यांमध्ये शेअर्स जमा करेल, तर ज्यांना वाटप मिळाले नाही त्यांच्यासाठी परतफेड देखील त्याच दिवशी केली जाईल.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार मारुती सुझुकी, वारी एनर्जीज, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, युनायटेड स्पिरिट्स, व्ही-मार्ट रिटेल, आरबीएल बँक, पीव्हीआर आयनॉक्स, ह्युंदाई मोटर इंडिया या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी-विक्री करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये ऑनमोबाइल ग्लोबल, वेल्सपन लिव्हिंग आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स यांचा समावेश आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये लुमॅक्स ऑटोटेक्नॉलॉजीज, सेनोरेस फार्मास्युटिकल्स, भारत सीट्स, रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज आणि गॅब्रिएल इंडिया यांचा समावेश आहे.
आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत, बाजारातील तज्ञ, चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज खरेदी करण्यासाठी सात इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (हुडको), एल अँड टी फायनान्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.