फोटो सौजन्य - Social Media
अशा प्रकारची आकर्षक आणि कलात्मक मांडणी आधुनिक पिढीला अध्यात्माच्या मार्गावर प्रेरित करणार असल्याचे ते म्हणाले. अलंकारीत ज्ञानेश्वरीचे अक्षर आकार मोठे असल्याने ज्येष्ठ नागरिकांनाही या ग्रंथाचे वाचन अधिक सुलभपणे करता येईल, हा या ग्रंथाचा मोठा फायदा असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यात्मिक ग्रंथांचे सादरीकरण आकर्षक आणि वाचकाभिमुख पद्धतीने झाले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मूल्यनिष्ठ विचार पोहोचू शकतात, अशी भावना शेलार यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेली ज्ञानेश्वरी ही मराठीतील सर्वात महत्त्वाची आणि दिव्य ग्रंथपरंपरा मानली जाते. “ही ज्ञानेश्वरी म्हणजे संपूर्ण मानवजातीला कवेत घेणारी जीवनमार्गदर्शक दिशा आहे. जीवात्म्यापासून परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाचे सूक्ष्म, सखोल आणि तात्त्विक वर्णन करणारे हे अमृतवचन आहे,” असे मतही आशिष शेलार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. भक्ती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचा अनोखा संगम असलेल्या या ग्रंथाचा अलंकारीत आविष्कार नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्यू एज मीडिया पार्टनर प्रा. लि. या जाहिरात संस्थेने आपल्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम हाती घेतला आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जाणिवांना पोषक असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत मंत्र्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “व्यावसायिक संस्थांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील मूल्यजतनाची जबाबदारी स्वीकारणे हा सकारात्मक संदेश आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकाशन कार्यक्रमाला न्यू एज मीडिया पार्टनरचे संचालक प्रसाद कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, अमित कबरे, महेश चव्हाण, संतोष किल्लेकर, मुकेश मोरे, प्रशांत कांगणे, चंद्रकांत जाधव, जसपाल जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही अलंकारीत ज्ञानेश्वरीच्या मांडणीचे आणि ग्रंथनिर्मितीमागील भावनेचे कौतुक केले. पारंपरिक आध्यात्मिक वारसा आधुनिक युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, अशीही भावना व्यक्त करण्यात आली.
विठ्ठल–रखुमाई मंदिरात झालेला हा प्रकाशन सोहळा भक्तिभाव, सांस्कृतिक उत्साह आणि अध्यात्मिक मूल्यांचा सुंदर संगम ठरला. अलंकारीत ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनातून नवी पिढी अध्यात्माशी जोडली जाण्याची आणि ज्येष्ठांना सुलभ वाचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






