बालभारतीचे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला (फोटो- सोशल मीडिया)
चौथीचे नवे गणित पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला
खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी
गणितातील संकल्पना पाठांतराऐवजी अनुभवातून समजावून देण्यावर भर
सोनाजी गाढवे/ पुणे: बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता चौथीसाठी तयार करण्यात आलेले गणित विषयाचे नवीन पाठ्यपुस्तक अधिक आकर्षक, कृतीप्रधान आणि विद्यार्थीकेंद्रित स्वरूपात तयार करण्यात आले आहे. दैनंदिन (Career) जीवनातील उदाहरणे, चित्रे, संवाद, खेळ, उपक्रम आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. गणितातील संकल्पना पाठांतराऐवजी अनुभवातून समजावून देण्यावर पुस्तकात विशेष भर देण्यात आला आहे.
या पुस्तकात संख्यांशी खेळू या, आकारांची गंमत भारी, बेरीज व वजाबाकी, अपूर्णांक, लांबी व वजन, माहितीचे व्यवस्थापन, नजरी नकाशा, गुणाकार, भागाकार, सममिती, परिमिती व क्षेत्रफळ, आकारमान व धारकता, कालमापन आणि आकृतीबंध असे एकूण १४ घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
‘संख्यांशी खेळू या’ पहिल्या घटकात हजारची ओळख क्रिकेट बॅटच्या किंमतीच्या उदाहरणातून करून देण्यात आली आहे. एक हजार ही संख्या विविध प्रकारे कशी तयार होते, चार अंकी संख्यांचे वाचन-लेखन, विस्तारित रूप, स्थानिक किंमत, चढता-उतरता क्रम तसेच मोठी-लहान संख्या यांसारख्या संकल्पना संवाद आणि कृतींच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या आहेत. सम आणि विषम संख्यांची ओळख फुलांचे गट तयार करण्याच्या उपक्रमातून करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनो सावधान! सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली पुस्तके असू शकतात ‘फेक’, NCERT चा मोठा इशारा
‘आकारांची गंमत भारी’ या घटकात हाताची बोटे, झाडांच्या फांद्या, योगासने तसेच दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तयार होणाऱ्या कोनांच्या उदाहरणांतून विद्यार्थ्यांना भूमितीची ओळख करून देण्यात आली आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या संकल्पना दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणे आणि संवादाच्या माध्यमातून शिकविण्यात आल्या आहेत. अपूर्णांक शिकविताना टॅनग्रामसारख्या कृतींचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांना आकृत्या कापून विविध आकार तयार करण्याची संधी देण्यात आली आहे.
लांबी, वजन, क्षेत्रफळ आणि धारकता यांसारख्या संकल्पना प्रत्यक्ष मोजमापाच्या उपक्रमांतून शिकविण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळेच्या परिसरातील वस्तूंची लांबी मोजण्यासाठी योग्य एककांची निवड, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर आणि किलोग्रॅम यांचा वापर विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला आहे. माहितीचे व्यवस्थापन, चित्रतक्ते, नजरी नकाशा, सममिती आणि आकृतीबंध या घटकांमधून निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि विश्लेषण कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
CBSE 10वी दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच; कुठे आणि कसा चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती
विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारतीय मीराबाई चानू आणि महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहितीही पुस्तकात देण्यात आली आहे. त्यामुळे गणित हा केवळ आकडेमोडीचा विषय न राहता आनंद, प्रयोग, निरीक्षण आणि विचारांची जोड देणारा विषय ठरावा, या उद्देशाने बालभारतीने चौथीचे नवीन गणित पुस्तक अधिक आधुनिक, रंजक आणि उपक्रमाधारित स्वरूपात साकारले आहे.






