बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल
बारामती, प्रतिनिधी : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत(नीट) बारामती येथील श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण देशात पाचवा रँक तर मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ओबीसी प्रवर्गामध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तिच्या या दैदिप्यमान कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे. श्रावणीचे आई-वडील ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण देशात नीट परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात, यामध्ये अशाप्रकारे विशेष यश संपादन करणे मोठे कठीण असते. बारामती मधील श्रावणीने या परीक्षेत तब्बल ९९.९९ टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम, प्रदेशात पाचवा रँक व मुलींमध्ये व ओबीसी प्रवर्गात संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले आहे.
श्रावणीच्या यशामागे कठोर परिश्रम, अविरत अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन, पालकांचे अनेक शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश आपण मिळवू शकलो, असे श्रावणी हिने सांगितले. श्रावणीच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.






