निविदा प्रक्रिया पारदर्शक; ७५ लाखांची बचत केली, घोटाळ्याचा प्रश्नच नाही - नगराध्यक्ष अनिल सावंत
वाई प्रतिनिधी : वाई नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेवरून सोशल मीडियावर उडालेल्या आरोपांच्या धुरळ्याला अखेर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी केलेले सर्व आरोप “बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे” असल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक असल्याचे ठामपणे सांगितले. याचबरोबर संबंधित निविदेमुळे वाई नगरपालिकेची तब्बल ७५ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा करत विरोधकांच्या आरोपांचा पुराव्यानिशी समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नगरपरिषदेच्या कारभाराबाबत संशय निर्माण करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होत्या. या पार्श्वभूमीवर बोलताना सावंत म्हणाले, “निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून तिच्या सर्व ‘कीज’ केवळ अधिकाऱ्यांकडे असतात. नगराध्यक्ष किंवा कोणताही लोकप्रतिनिधी या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. नियमांनुसार चार सदस्यीय निविदा समितीने सर्व प्रक्रिया पार पाडून १५ टक्के कमी दराची निविदा मंजूर केली आहे.”
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘सृष्टी कन्स्ट्रक्शन’ या कंपनीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत सावंत म्हणाले, “मी त्या संस्थेला ओळखतही नाही. माझे नाव हेतुपुरस्सर या प्रकरणात ओढले जात आहे.”
यानंतर त्यांनी विरोधकांवर थेट राजकीय हल्ला चढवला. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी आपण आणल्याचे सांगत त्यांनी आरोप केला की, हा ठेका मिळवण्यासाठी एका राजकीय पक्षाशी संबंधित एजंटने विविध प्रकारचे दबाव आणि आमिषांचे राजकारण केले आहे व वाईच्या विकासामध्ये हा राजकीय एजंट वाईच्या विकासाला खिळ घालत असल्यासही नगरसेवक अनिल सावंत यांनी स्पष्ट केले तर काही लोकल कार्यकर्ते मंत्र्याचा पीए बोलतोय असं सांगून नगर परिषदेमध्ये वारंवार फोन करून दिशाभूल केल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले तर काहीं नगरसेवकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला, इतकेच नव्हे तर एका मंत्र्यांच्या पी.ए. असल्याचे वारंवार सांगून प्रशासनावर दबाव आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पारदर्शक निविदा प्रक्रियेवर आपण ठाम राहिल्याने हे सर्व डाव उधळून लागल्याचा दावा त्यांनी केला.
सावंत यांनी आणखी एक गंभीर दावा करत सांगितले की, ५ कोटी रुपयांची निविदा तब्बल १४ महिने प्रलंबित ठेवण्यात आली होती. त्यातील आठ महिन्यांच्या विलंबामागे नेमके कोण जबाबदार आहे, याचाही लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “स्थायी समितीने मंजूर केलेली निविदा ५ कोटींऐवजी ४ कोटी २५ लाख रुपयांची आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे थेट ७५ लाख रुपये वाचले. जनतेच्या पैशाची बचत करणे हा गुन्हा असेल, तर वाईकरांसाठी असा गुन्हा मी रोज करायला तयार आहे.”पत्रकार परिषदेत त्यांनी नागरिकांनाही थेट आवाहन केले.
“या संपूर्ण निविदा प्रक्रियेतील सर्व कागदपत्रे नगरपालिकेत उपलब्ध आहेत. कोणालाही शंका असल्यास त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी. आम्ही पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवतो आणि वाईकरांनी दिलेला विश्वास कोणत्याही परिस्थितीत तुटू देणार नाही,” असे ते म्हणाले.
नगराध्यक्षांच्या या आक्रमक आणि पुराव्यांचा दावा करणाऱ्या भूमिकेमुळे वाईतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईला आता नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधक यावर काय भूमिका घेतात आणि या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के,विरोधी पक्षनेते विजय ढेकाने,यांच्या सह सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
या टेंडर प्रक्रियेत 5 ठेकेदार सहभागी झाले होते.टेंडर धारकाकडे 5 नगरपंचायत अथवा नगरपालिका अथवा महानगरपालिका यांच्या कामाचा अनुभवाचा दाखला असणे बंधनकारक होते. तर त्या ठेकेदारांची सद्यस्थितीत चालू असलेल्या कामाची ‘कार्यादेश'(वर्क ऑर्डर) जोडण्याची सूचना देखील नियम अटी शर्थी मध्ये नमूद करण्यात आली होती. यातील नियमांचा आधार घेऊन 5 पैकी 3 ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, याबाबत टेंडर प्रक्रिया समितीमधील शासकीय चार सदस्यीय कमिटीमध्ये मतभिन्नता आल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तिसऱ्या टेंडरचे ‘बीड’ स्थायी समितीच्या ठरावाने उघडण्यात आले. याच तिसऱ्या ठेकेदाराची निविदा 15 टक्के कमी दराची असल्याने ‘सृष्टी कन्स्ट्रक्शन’ ला हा ठेका मिळाला. यातूनच आधीच्या तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे अपात्र ठरलेल्या ठेकेदाराला पुन्हा संधी का मिळाली यावरून हा वाद सुरू झाल्याचे जाणकारांचे मत आहे






