ठाणे/ स्नेहा जाधव काकडे: जुनच्या सुरुवातीस शालेय प्रवेशासाठी शाळांची आणि पालकांची लगबग सुरु होते. याचपार्श्वभूमीवर आता ठाण्यात शिक्षणाधिकारी यांनी नवं धोरण लागू केलं असल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी शालेय नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही नोंदणी राज्य शासनाच्या Pre-School Registration Portal (ECCE) वर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ठाणेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी एका अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.
पूर्व प्राथमिक शाळा, नर्सरी, जूनियर केजी, सीनियर केजी अशा कोणत्याही स्वरूपात शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी आपली नोंदणी education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Pre-School Registration टॅबवर करणे आवश्यक आहे.
1. शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे
2. इमारत पूर्णत्वाचा दाखला (Building Completion Certificate)
3. आरोग्य व स्वच्छता प्रमाणपत्र (Cleanliness Maintenance Certificate)
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अन्वये 3 ते 6 वयोगटातील मुलांना एकसंध व नियोजनबद्ध शिक्षण सुविधा देण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येत आहे.पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी शाळा व केंद्रांनी आपली नोंदणी अनिवार्यपणे पूर्ण करावी, अन्यथा नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) बाळासाहेब राक्षे यांनी दिला आहे.