फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता दहावी आणि बारावीच्या ३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या काही विषयांच्या परीक्षांना प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात मंडळाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, काही महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा नव्या तारखांना घेण्यात येणार आहेत. CBSE कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावीच्या प्रादेशिक आणि परदेशी भाषा विषयांच्या परीक्षा आता ११ मार्च २०२६ रोजी घेण्यात येतील. यामध्ये तिबेटियन, भोटी, भुटिया, बोडो, तांगखुल, मिजो, काश्मीरी या प्रादेशिक भाषांसह जर्मन, जपानी, स्पॅनिश आणि बहासा मेलायू या परदेशी भाषांचा समावेश आहे. तसेच अकॅडमिक इलेक्टिव्ह (ग्रुप A2) अंतर्गत येणाऱ्या नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) आणि एलिमेंट्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयांच्या परीक्षाही याच दिवशी म्हणजे ११ मार्च रोजीच होणार आहेत.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ३ मार्च २०२६ रोजी होणारी लीगल स्टडीज (Legal Studies) या विषयाची परीक्षा आता १० एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. इतर सर्व विषयांचे वेळापत्रक मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
CBSE चे परीक्षा नियंत्रक (Controller of Examinations) डॉ. संयम भारद्वाज यांनी २९ डिसेंबर २०२५ रोजी याबाबत अधिकृत परिपत्रक काढत सर्व CBSE संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना माहिती दिली आहे. या परिपत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, “इयत्ता दहावी आणि बारावीच्या ज्या विषयांच्या परीक्षा ३ मार्च २०२६ रोजी नियोजित होत्या, त्या प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित तारखांनुसार इयत्ता दहावीच्या परीक्षा ११ मार्च २०२६ रोजी, तर इयत्ता बारावीची लीगल स्टडीजची परीक्षा १० एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येईल.”
मंडळाने हेही स्पष्ट केले आहे की, सुधारित परीक्षा तारखा विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये (Admit Cards) देखील दर्शविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी घाबरून न जाता सुधारित वेळापत्रकानुसार तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळांनी आपल्या अंतर्गत परीक्षा वेळापत्रकात आवश्यक ते बदल करून विद्यार्थ्यांना याची माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
प्रादेशिक आणि परदेशी भाषा विषयांबाबत बोलायचे झाल्यास, तिबेटियन, भोटी आणि भुटिया हे विषय प्रामुख्याने लडाख, सिक्कीमसारख्या हिमालयीन भागातील विद्यार्थी निवडतात, ज्यामुळे स्थानिक संस्कृती आणि वारशाचे जतन होते. बोडो, तांगखुल, मिजो आणि काश्मीरी या भाषा देशातील भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. तर जर्मन, जपानी, स्पॅनिश आणि बहासा मेलायू या परदेशी भाषा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि संवाद कौशल्यांची ओळख करून देतात.
दरम्यान, परीक्षांच्या तारखा बदलल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून, या बदलाचा फायदा योग्य नियोजन करून घ्यावा, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञांकडून दिला जात आहे. CBSE कडून जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेत कोणताही गोंधळ होणार नाही, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.






