फोटो सौजन्य - Social Media
ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन होण्यासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. या संदर्भातील बैठक मंत्रालयात मंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार सुरेश म्हात्रे, आमदार सुलभा गायकवाड, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपसचिव प्रशांत पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले की, “जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढेल, त्यांची नियमित उपस्थिती आणि शाळेतील शिस्त नियंत्रणात राहील. यामुळे एकूणच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल.” त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. ठाणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत, मंत्री गोरे यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भर देण्याची गरज व्यक्त केली. जिल्ह्यातील विकासकामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून, त्याचा योग्य वापर करून कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.
शाळांची दुरुस्ती, इमारतींचे मजबुतीकरण, तसेच आवश्यक सुविधा पुरविण्याचे कामही प्राधान्याने करण्यात यावे, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास आणि आवास योजना या क्षेत्रांत ठाणे जिल्ह्यात उल्लेखनीय काम सुरू असून, येत्या काळात या सर्व योजनांचे उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विभागीय चौकशा वेळेत पूर्ण होण्यासाठी लवकरच एकसंध सूचना जारी करण्यात येणार असल्याचेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.






