फोटो सौजन्य- सोशल मीडिया
General vs Honours Course: १२ वीचा निकाल लागताच प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यात एकच विचार चक्र सुरू होते- चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे. परंतु, जेव्हा तुम्ही कॉलेजचा फॉर्म भरण्यासाठी बसता, तेव्हा अनेकांसमोर हाच प्रश्न येतो की, ‘जनरल’ आणि ‘ऑनर्स’ यामध्ये नेमका फरक काय आहे.
अनेकदा विद्यार्थी फारसा विचार न करता केवळ ट्रेंड पाहून किंवा मित्रांच्या मागे मागे जाऊन कोणताही कोर्स निवडतात. त्यानंतर अभ्यासाच्या दडपणामध्ये अडकतात. वास्तविक पाहता, ऑनर्स आणि जनरल हे दोन्ही कोर्सेस दिसायला जरी एकसारखे वाटले, तरी त्यांचा अभ्यासक्रम (Syllabus), शिकवण्याची पद्धत आणि पुढे मिळणाऱ्या करिअरच्या संधी पूर्णपणे वेगवेगळ्या असतात. जर तुम्हीही यंदा कॉलेज प्रवेशाची तयारी करत असाल, तर तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कोणती डिग्री बेस्ट आहे, हे समजून घ्या.
जनरल आणि ऑनर्स डिग्रीमधील सर्वात मोठा फरक ‘फोकस’ (लक्ष्य) चा असतो. जनरल डिग्री (उदा. बीए किंवा बीकॉम) हा ऑल-राउंडर कोर्स आहे. यामध्ये कोणत्याही एकाच विषयावर अवलंबून राहण्याऐवजी अनेक मुख्य विषयांचा समतोल अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही जनरल बीए करत असाल, तर इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्रजी हे तिन्ही विषय एकत्र अभ्यासाल. याउलट, ऑनर्सचा अर्थ ‘स्पेशलायझेशन’ असा आहे. ‘इंग्लिश ऑनर्स’चा अर्थ असा की, तुमच्या अभ्यासाचा ७० ते ८०% भाग केवळ आणि केवळ इंग्रजी साहित्य, त्याचा इतिहास आणि लेखक यांच्याभोवतीच फिरेल. इतर विषय केवळ नावापुरतेच सहाय्यक भूमिकेत असतील.
ऑनर्स डिग्रीमध्ये एखाद्या विषयाच्या अतिशय खोलीत जाऊन अभ्यास करावा लागतो. म्हणूनच याचा अभ्यासक्रमाचा आवाका मोठा आणि थोडा कठीण असतो. यामध्ये सिद्धांत, संशोधन आणि सखोल विश्लेषणावर अधिक भर दिला जातो. म्हणजेच येथे अभ्यासाचा ताण थोडा जास्त असेल. दुसरीकडे, जनरल किंवा पास कोर्सचा अभ्यासक्रम ऑनर्सच्या तुलनेत थोडा हलका आणि सोपा असतो. यामध्ये खूप खोलीत जाऊन संशोधन करावे लागत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी चांगला वेळ मिळतो.
ऑनर्स डिग्री ही अधिक प्रगत मानली जाते. म्हणूनच देशातील टॉप युनिव्हर्सिटींमध्ये (उदा. दिल्ली युनिव्हर्सिटी) ऑनर्स कोर्सेसचा कटऑफ खूप जास्त लागतो. १२ वीमध्ये उत्कृष्ट गुण असतील, तरच चांगल्या कॉलेजमध्ये ऑनर्स मिळते.
जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयाचा प्रोफेसर व्हायचे असेल, संशोधन करायचे असेल किंवा मास्टर डिग्री घ्यायची असेल, तर ऑनर्स बेस्ट आहे. अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये ४ वर्षांच्या ऑनर्स डिग्रीलाच प्राधान्य दिले जाते. कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्येही अनेकदा ऑनर्सच्या विद्यार्थ्यांना अधिक पसंती दिली जाते.
Cheapest IIM in India: एमबीए करायचयं! मग ‘या’ सर्वात स्वस्त आयआयएम संस्थांबद्दल नक्की जाणून घ्या
परंतु, जर तुम्हाला पदवीनंतर लगेचच यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बँकिंग किंवा इतर सरकारी परीक्षांची तयारी करायची असेल, तर जनरल डिग्री अधिक फायदेशीर ठरू शकते. जनरल कोर्समध्ये अभ्यासाचा ताण कमी असतो, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळतो. तसेच, जनरल कोर्समध्ये शिकवले जाणारे अनेक विषय सरकारी परीक्षांच्या अभ्यासक्रमाशीही सुसंगत असतात.






