फोटो सौजन्य - Social Media
युपीएससी परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात, पण यशस्वी ठरणारे हाताच्या बोटावर मोजता येतील. यामध्ये काही विद्यार्थी असेही असतात, जे पूर्वीच्या शैक्षणिक प्रवासात अपयशी ठरलेले असतात. अशाच एका विद्यार्थ्याची गोष्ट आज जाणून घेणार आहोत, जे कॉलेजमध्ये दोनदा नापास झाले, तरीही अपयशावर मात करत IAS बनले. ही गोष्ट आहे बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील IAS अनुराग कुमार यांची. त्यांचे आयुष्य अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते.
अनुराग कुमार यांचे शिक्षण आठवीपर्यंत हिंदी माध्यमातून झाले होते. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी माध्यम बदलले. मात्र, माध्यम बदलल्यामुळे त्यांची अडचण झाली. ते प्रीबोर्ड परीक्षेत नापास झाले आणि बोर्ड परीक्षेतही फारसे चांगले गुण मिळाले नाहीत. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी दिल्ली गाठले.
दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये (SRCC) प्रवेश घेतल्यानंतर त्यांना घरापासून दूर राहणं कठीण वाटलं. त्यामुळे ग्रॅज्युएशन दरम्यान अनेक विषयांत नापास झाले. त्यांनी 2014 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर 2016 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पोस्ट-ग्रॅज्युएशन केलं.
अनुराग सांगतात की, युपीएससी परीक्षा फक्त बुद्धिमत्तेची नव्हे, तर तयारी, नियोजन आणि सातत्याची कसोटी असते. मागील अपयश विसरून नव्याने सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. युपीएससी परीक्षा पूर्वीच्या शिक्षणाशी संबंधित असावी अशी गरज नाही. कोणत्याही विषयाचं पूर्वज्ञान नसतानाही, योग्य मेहनतीने ही परीक्षा उत्तीर्ण करता येते. या परीक्षेत घाई करण्याऐवजी प्रत्येक विषयाची सखोल समज आवश्यक असते. त्यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा युपीएससी परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली, मात्र 677 रँकने समाधान मिळालं नाही. म्हणूनच त्यांनी 2018 मध्ये पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी पास करत IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.