फोटो सौजन्य - Social Media
भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबईने वित्तीय सेवा क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिकांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए इन वेल्थ मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंटच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाचे उद्घाटन १५ जुलै रोजी पवई येथील आयआयएम मुंबई कॅम्पसमध्ये झाले असून, १८ जुलैपासून वर्गांना सुरुवात झाली आहे. भारतातील वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्राला समर्पित अशा मोजक्या अभ्यासक्रमांपैकी हा एक अभ्यासक्रम मानला जात आहे. ५२ आठवड्यांच्या वीकेंड सत्रांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या नॉन-रेसिडेन्शियल कार्यक्रमात शैक्षणिक ज्ञानासोबत उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे वित्तीय क्षेत्रातील व्यावसायिकांना कौशल्यवृद्धीची संधी मिळणार आहे.
या अभ्यासक्रमात पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम मूल्यांकन, कर नियोजन, इस्टेट प्लॅनिंग आणि बिहेव्हियरल फायनान्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. आयआयएम मुंबईचे प्राध्यापक अध्यापन करणार असून, निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंटसह उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञही विशेष सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय आयआयएम मुंबई आणि निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंट यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, वेल्थ मॅनेजमेंटविषयक मास्टरक्लासेस, केस स्टडीज, संशोधन आणि उद्योगविषयक ज्ञानाचा प्रसार डिजिटल माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतामध्ये वाढणारी संपत्ती, गुंतवणुकीच्या बदलत्या संधी आणि वेल्थ अॅडव्हायजरी सेवांची वाढती मागणी लक्षात घेता या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची गरज वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा अभ्यासक्रम वित्तीय क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.






