IIT मुंबईत 'ई-यंत्रा' रोबोटिक्सचा थरार! देशभरातील तरुण अभियंत्यांनी सादर केले भन्नाट आविष्कार
या स्पर्धेत देशातील १६ राज्यांमधील ५१ महाविद्यालयांमधून निवड झालेल्या २२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण १०४७संस्थांमधून ही निवड करण्यात आली होती. यामध्ये डिप्लोमा तसेच पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. ‘थीम रन’मध्ये ४१ संघांनी स्पर्धा केली, तर १९ संघांनी प्रोजेक्ट प्रदर्शनात आपली संकल्पना मांडली.
इनोव्हेशन चॅलेंजमध्ये ५९ अंतिम स्पर्धक (३६ मुले, २३ मुली) आणि १३ शिक्षक सहभागी झाले. रोबोटिक्स स्पर्धेत १५३ विद्यार्थी (११६ मुले, ३७ मुली) सहभागी झाले होते. या सहभागातून स्टेम क्षेत्रात मुलींचा वाढता सहभाग दिसून आला. या स्पर्धेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. क्वाडुपेड रोबोट, प्रगत रोबोटिक आर्म्स, सेल्फ-बॅलन्सिंग रोबोट, टोमॅटो सॉर्टिंग प्रणाली आणि ‘रिइनफोर्समेंट लर्निंग ‘चा वापर यांसारख्या प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमादरम्यान’ संशोधनातील करिअर’ आणि ‘कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची भूमिका’ या विषयांवर तज्ज्ञांची चर्चासत्रेही झाली.
शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणार! शिक्षक पदभरतीत सर्वाधिक गुणधारकांनाच मिळणार प्राधान्य
उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे काही प्रकल्पांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय सुचवले. मल्टी-क्रॉप्स डीहस्कर या उपकरणामुळे सुपारीसारख्या पिकांच्या प्रक्रियेसाठी कमी खर्चात पोर्टेबल उपाय उपलब्ध झाला आहे. अग्रीनोव्हा स्मार्ट ओनियन स्टोरेज सिस्टमने आयओटी तंत्रज्ञानाच्या मदतीने साठवणुकीतील नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला, तर ऍग्रोवाल्ट या प्रकल्पाने एआय व सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नसाठ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम केले.
ई-यंत्राचे संस्थापक कवी आर्या यांनी विद्यार्थ्यांना ‘ज्ञानाचे ग्राहक नव्हे तर ज्ञाननिर्माते’ बनवण्याचा उद्देश स्पष्ट केला. तर शिवराम कल्याणकृष्णन यांनी भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित निर्णयक्षम प्रणालींचा समावेश करून या उपक्रमाला अधिक सक्षम करण्याचा दृष्टिकोन मांडला. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि रोजगारक्षमतेला चालना मिळत असून, देशातील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे स्पष्ट झाले.
शिक्षकांच्या उन्हाळी सुट्या जनगणनेत! १६ मेपासून जनगणना प्रारंभ; शिक्षकांमध्ये नाराजी






